Join us  

"मराठी चित्रपट व्यवस्थित रिलीज होत नाहीत..."; मिलिंद गवळींनी पोस्टमधून मांडला महत्वाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 2:38 PM

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर गिरीजा ओकसोबतच्या सिनेमाची आठवण शेअर करुन खास पोस्ट लिहिली आहे (milind gawali, aai kuthe kay karte)

'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी सतत त्यांच्या आयुष्याचे अनुभव सर्वांसोबत शेअर करत असतात. मिलिंद गवळींनी अशाच एका सिनेमाबद्दलचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. मिलिंद गवळींनी अभिनेत्री गिरीजा ओकसोबत चिंगी या सिनेमात काम केलं होतं. पण दुर्देवाने हा सिनेमा फार कमी थिएटरमध्ये रिलीज झाला. मिलिंद गवळींनी या सिनेमाविषयीचे खास क्षण शेअर करुन सांगितलंय की, "राज इसराणी यांनी दिग्दर्शित केलेला आणि अनिता इसराणी यांनी निर्मित केलेला स्त्रीभ्रूण हत्ये वर आधारित माझा हा एक अप्रतिम सिनेमा आहे,अशोक पाटोळे यांची कथा, पटकथा व संवाद अशोक पत्की यांचं संगीत, "तारे जमीन पर" चित्रपटानंतर गिरीजा ओक यांचा हा पहिला मराठी चित्रपट, ज्यात तिने अतिशय उत्कृष्ट काम केलं."

मिलिंद गवळी पुढे लिहितात,  "या चित्रपटांमध्ये मला जी मुख्य भूमिका देण्यात आली ती इतकी सकारात्मक, पॉझिटिव्ह होती की हिरो कसा असावा तर या चित्रपटांमधल्या प्रशांत सारखा असावा, आपल्याला मुलगी होणार याचा त्याला इतका आनंद होतो की त्याचा आनंद गगनात मावत नाही, आणि आपली पत्नी "हे मूल मला नकोय" असं म्हणते त्यावेळेला तो तिला विरोध करतो, आणि मुली किती महत्त्वाचे आहे, मुलींमुळे जग कसं सुंदर आहे, मुलींशिवाय हे जग किती भकास होईल हे सगळं तिला पटवून द्यायचा प्रयत्न करतो, अनिता आणि राज यांच्याशी अनेक वर्षापासून माझे व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध, त्यामुळे या रोलसाठी त्यांनी दुसरं कोणालाही विचारलं नव्हतं,ऍड एजन्सी असल्यामुळे हजारो कलाकार त्यांच्या संपर्कात होते, त्यातून त्यांनी माझी निवड केली.

 मिलिंद गवळी पुढे लिहितात, "आमिर खान बरोबर चित्रपट केला असल्यामुळे गिरीजा मराठी चित्रपट करेल की नाही याची त्यांना शंका होती, गोष्ट ऐकल्यावर एका सेकंदात तिने होकार दिला, या विषयामुळे या चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकार सुद्धा पाहुणे कलाकार म्हणून काम करायला तयार झाले, आणि अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार झाला, मराठी चित्रपटाचे वितरण ही एक खूप मोठी समस्या आहे, आपल्याकडे मराठी चित्रपट व्यवस्थित रिलीज होत नाहीत, चिंगी हा चित्रपट फक्त 19 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, वितरकाचं म्हणणं होतं, हा चित्रपट इतका चांगला आहे की प्रेक्षक त्याला छान प्रतिसाद देतील, मग दोन आठवड्यानंतर आपण भरपूर चित्रपटग्रहांमध्ये हा लावूया, पण दुसऱ्या आठवड्यातच एक मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, आणि चिंगी चित्रपटाला थेटर्स मिळाले नाहीत, आता हा चित्रपट 19 थेटर मध्ये ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांना तो अतिशय आवडला."

मिलिंद गवळी शेवटी लिहितात, " आता असे चांगले चित्रपट जर बघायला मिळाले नाहीत तर ते टीव्हीवर येतात ओटीटीवर येतात आणि तेव्हा लोक आवर्जून बघतात, पण या चित्रपटाला योग्य तो भाव न मिळाल्यामुळे राज इसरानी यांनी हा चित्रपट कुठल्याही टीव्ही वाहिनीला दिलेला नाही, म्हणजे इतक्या चांगल्या विषयाचा, लोकांना अतिशय भावलेला हा चित्रपट, तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही आहे,पंधरा वर्षे होऊन गेली या गोष्टीला, राज सरानेकडे हा चित्रपट आहे, आजही तो तितकाच फ्रेश आणि कंटेम्पररी वाटतो, बघूया चिंगी केव्हा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतो ?"

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकागिरिजा ओक