‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका सध्या तुफान गाजतेय. अरूंधती आणि अनिरूद्धचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात नवनवीन बदल पाहायला मिळतोय. अनिरूद्धला संजनाची साथ मिळाली आणि अरूंधतीच्या आयुष्यातही आशुतोषची एन्ट्री झालीये. पण आशुतोषची एन्ट्री अनिरूद्धला आत्तापासूनची खुपू लागली आहे.आशुतोष अरूंधतीचा तिचा कॉलेजचा मित्र, कॉलेजमध्ये असतानापासून तिच्यावर प्रेम करणारा. तो आल्याने अनिरूद्ध काहीच इनसिक्युर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी याविषयी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट...
‘काही माणसे आयुष्याच्या अशा वळणावर भेटतात ज्यावेळेला आधाराची अत्यंत गरज असते आणि तो योग्य व्यक्ती भक्कम आधार देऊ शकतो. अरुंधतीच्या आयुष्यामध्ये आशुतोष केळकर आला आहे, कॉलेजचा मित्र, कॉलेजमध्ये तिच्या प्रेमात असणारा. जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, हिवाळा येतो तसं माणसाच्या आयुष्याचे ऋतूही बदलतात. अनिरुद्धच्या कर्माचे परिणाम अरुंधतीला भोगावे लागले, तिच्या आयुष्यात वाईट दिवस आले. पण वाईट दिवस फार काळ राहत नाहीत. अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष चांगले दिवस घेऊन येईल. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे असंच घडत असतं. दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात, काही क्षणी असं वाटत होतं की संपणारच नाही का हा कोरोना? आता असंच जगावं लागणार का? सिनेमांचे थिएटर्स उघडणार नाहीत का? आता थिएटरमध्ये नाटकं बघायला नाही मिळणार का? लॉकडाऊन संपणारच नाही का? परवा ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचा ट्रेलर बघितला. 5 तारखेला थेटरमध्ये रिलीज होतोय, हळूहळू थेटर्स सुरू होतील अशी आशा वाटते. लोकं सिनेमांना जायला लागतील. असंच आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती पुन्हा आनंदी राहायला लागेल. आशुतोष केळकर हा तिच्यासाठी चांगले दिवस घेऊन येईल, नक्की घेऊन येईल. नि:स्वार्थ प्रेम करणारी माणसं नेहमी दुसºयाचं भलं करतात दुसºयाचं चांगलं करतात. आशुतोष केळकर हा तसाच आहे. अनिरुद्ध देशमुखचा पश्चाताप, त्याच्या चुकीची जाणीव, आयुष्यात त्यांनी काय गमावलं, हे आता त्याला कळायला लागणार. अनिरुद्ध देशमुखच्या आयुष्यातला लॉकडाऊन सुरू झालाय,’ असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मालिकेत आशुतोष केळकर ही भूमिका अभिनेता ओंकार गोवर्धन साकारत आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी समीर धर्माधिकारीच्या नावाची चर्चा होती. परंतु, आता ही भूमिका ओंकार साकारणार आहे. ओंकार गोवर्धन हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याची 'सावित्री जोती' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.