‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या शर्यतीत कायम अव्वल असलेली ही मालिका गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळाले. देशमुखांच्या घरात या लग्नावरनं वादावादी झाली. अनिरूद्धने या लग्नात एक ना अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांचा विरोध झुगारून अरुंधतीने हे लग्न केलंच. या लग्नाची सोशल मीडियावरही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. प्रेक्षकांनी या लग्नावर वेगवेगळी मतं दिली. काहींनी अरूंधती आशुतोषच्या लग्नाला पाठींबा दिला असला तरी अनेकांचा या लग्नाला विरोध केला. या वयात लग्नाचा घाट घालणाऱ्या मेकर्सला अनेकांनी ट्रोल केलं. आता या सगळ्या ट्रोलिंगला अरूंधती अर्थात हे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने (Madhurani Prabhulkar) सणसणीत उत्तर दिलं आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची व्यक्तिरेखा मधुराणी प्रभूलकर साकारताना दिसत आहे. मधुराणीने इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मधुराणीची पोस्ट...
“अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं.हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने केली आहे.आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले ही साकारते.