Join us

मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 1:08 PM

मिलिंद गवळींनी संजय लीला भन्साळींच्या एका मराठी सिनेमात काम केलं आहे. याबाबत त्यांनी पोस्टमधून अनुभव शेअर केला आहे. 

संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. बिग बजेट सिनेमांसाठी ते ओळखले जातात. पद्मावत, देवदास, बाजीराव मस्तानी, गंगुबाई काठियावाडी, हम दिल दे चुके सनम हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आई काय कुठे करतेमधील मिलिंद गवळी यांचंदेखील असंच स्वप्न होतं. भन्साळींचे सिनेमे पाहून भारावून गेलेल्या मिलिंद गवळींना या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 

'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे लोकप्रिय सिनेअभिनेते आहेत. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ त्यांनी अभिनयाने गाजवला होता. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरही ते सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मिलिंद गवळींनी संजय लीला भन्साळींच्या एका मराठी सिनेमात काम केलं आहे. भन्साळींची निर्मिती असलेल्या लाल इश्क सिनेमात ते झळकले होते. याबाबत त्यांनी पोस्टमधून अनुभव शेअर केला आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

1996 मध्ये 'खामोशी द म्युझिकल' ही संजय लीला भन्साळी यांची फिल्म मी थिएटरमध्ये पाहिली. कारण, त्या सिनेमाचं कास्टिंग इतकं भन्नाट होतं. नाना पाटेकर आणि सीमा विश्वास, सलमान खान आणि मनीषा कोइराला...दोन आर्ट फिल्मचे कलाकार आणि दोन कमर्शियल फिल्मचे कलाकार एकत्र या सिनेमात त्यांनी घेतले होते. 

दोघांचीही अॅक्टींगची पद्धत खूप वेगळी...त्यात नाना पाटेकर एकाच मुक्याच्या भूमिकेत भन्नाट, त्या सिनेमाची गाणी अप्रतिम होती...

त्यानंतर मी "दिल दे चुके सनम" पाहिला. उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट गाणी... त्यात उत्कृष्ट नृत्य 'ढोलितारो ढोल बाजे' ज्या पद्धतीने पिक्चरराईस केलं होतं. त्यात अजय देवगनचं कॅरेक्टर...फारच छान सिनेमा होता. 

मग 2005 मध्ये मला एका अवॉर्ड फंक्शनला बोलवलं होतं. सूटबिट घालून तिथे पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला त्यांनी खूपच मागच्या रांगेत बसायला सांगितलं. मी सरळ तिकडून निघालो आणि वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये संजय लीला भन्साळी यांचा "ब्लॅक" सिनेमा पाहिला. बच्चनसाहेब आणि राणी मुखर्जी यांचा अभिनय, त्यात एका लहान मुलीने आयुष्या कपूरने मिशेलच काम केलं होतं. फारच भारी काम केलं होतं तिने...संजय लीला भन्साळी यांचे सिनेमे म्हणजे पैसा वसूल फिल्म असायचे. 

तसंच "देवदास" ज्या वेळेला मी बघायला गेलो होतो प्लाझा सिनेमांमध्ये...इतका भव्य दिव्य सिनेमा बघून मी खरंच खूपच भारावून गेलो होतो. ही भव्य दिव्य कल्पना करायची आणि ती प्रत्यक्षात उतरवायची. किती भारी असेल संजय लीला भन्साळी...आणि एक दिवस मला दिग्दर्शिका स्वप्न जोशी वाघमारे एका चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी फोन आला. त्या चित्रपटाचे निर्माते होते संजय लीला भन्साळी...आपल्याला संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये काम करायला मिळणार आहे, याचा मला खूप आनंद झाला. ते मराठी चित्रपटाची निर्मिती करणार होते. 

'चांदणी' सिनेमामध्ये विनोद खन्नाचा जो रोल, तशा पद्धतीचा रोल मला देण्यात आला. मी त्यांना विनंती केली मला तुम्ही Guest Appearance हे टायटल द्या. शबिना खान सह-निर्माती तयार झाल्या आणि संजय लीला भन्साळी यांच्या निर्मितीमध्ये "लाल इश्क" नावाचा मराठी चित्रपट मी केला. 

त्या सिनेमाच्यादरम्यान संजय लीला भन्साळी यांच्याशी माझ्या दोन वेळा भेटी गाठी झाल्या. गप्पागोष्टी पण झाल्या...त्याच वेळेला त्यांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट शंभर दिवस चालला होता. त्या चित्रपटांमुळे पण मी भारावून गेलो होतो. इतकं भव्यदिव्य हा मनुष्य कसा काय करू शकतो? याचं मला कुतूहल वाटायचं, कुठल्या प्रकारची एनर्जी असावी या माणसाच्या आतमध्ये...

मिलिंद गवळींची ही पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. सध्या मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. 

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकासंजय लीला भन्साळीमराठी अभिनेता