Milind Gawali: स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (aai Kuthe Kay Karte) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका बंद होणार आहे. अगदी अल्पावधीतच ही मालिका आणि त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी चाहत्यांच्या मनावर उमटवला आहे. दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते' मालिकेचे निरोपाचे भाग पाहण्याचं आवाहन केलं आहे.
सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने मिलिंद गवळींचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ही मालिका करताना अनिरुद्धच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादावर भाष्य केलंय. व्हिडीओमध्ये मिलिंद गवळी म्हणतात, "स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने मला काय दिलं? म्हणजेच आईने मला काय दिलं? गेली अनेक वर्ष मी मालिका, चित्रपटांमध्ये गुणी, संस्कारी नायक म्हणून पुढे आलो. मला आठवतं, मी अनिरुद्ध साकारायला सुरुवात केल्यानंतर एकदा मार्केटमध्ये गेलो होतो, तेव्हा मला एक मावशी भेटल्या. मला म्हणाल्या, तुम्ही तेच ना? 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचे मिस्टर, अनिरुद्ध! मी हो म्हटलं आणि त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली वाहिली. आतापर्यंत नट म्हणून माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार होता. 'आई कुठे काय करते' या मालिकेने मला हा पुरस्कार दिला. आईने मला आणि उभ्या महाराष्ट्राला भरभरुन दिलं आणि हे ही शिकवलं की एका पुरुषाने कसं नसावं." असा किस्सा त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.