Join us

"रडले, उठले, सावरलं, आता...", 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- "५ वर्षांत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:09 IST

मालिका संपल्यानंतर कलाकारही भावुक झाले आहेत. आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेने ५ वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता या मालिकेने निरोप घेतला आहे. ३० नोव्हेंबरला (शनिवारी) या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिका संपल्यानंतर कलाकारही भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेतील कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका अपूर्वाने साकारली. सुरुवातीला अल्लड असणाऱ्या आणि चुकीचे निर्णय घेणाऱ्या ईशाचा समजूतदार होण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत दिसला. या मालिकेमुळेच अपूर्वाला लोकप्रियता मिळाली.  'आई कुठे काय करते'मुळे अपूर्वा प्रसिद्धीझोतात आली. देशमुखांच्या घरची लाडकी लेक प्रेक्षकांचीही लाडकी झाली. आता मालिका संपल्यानंतर या ५ वर्षांचा प्रवास अपूर्वाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. अपूर्वाने समृद्धी बंगल्याबरोबरचा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

अपूर्वाने पोस्टमधून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "खूप प्रेम खूप gratitude. ५ वर्ष! इशा, आई कुठे काय करते, अचानक आले आणि आयुष्य बदलून गेले. खूप शिकले. पडले, रडले, उठले, सावरलं.. आता पुढची वाटचाल सुरू. खूप लोकांना thank you म्हणायचं आहे.. ५ वर्षांत इतकी नाती जोडल्या गेली की आपल्या माणसांचे आभार मानून परक करायचं नाहीये...भावना खूप आणि शब्द कमी असं झालंय. पुढेही मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करेन हे promise. भेटूच...काळजी घ्या...", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटायचं. या मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकरने साकारली होती. तर अपूर्वा ईशा या अरुंधतीच्या लेकीच्या भूमिकेत होती. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारस्टार प्रवाह