'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात. मिलिंद मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारत आहेत. मिलिंद यांंनी हिंदू नवीन वर्ष अर्थात गुढीपाडव्यानंतर एक खास पोस्ट केलीय जी चर्चेत आहे. मिलिंद गवळी लिहितात, "नवीन वर्षाचे नवीन कपडे नवीन संकल्प नवीन स्वप्न नवीन ऊर्जा.नवीन पहाट नवीन सूर्योदय नवीन आशा. एकदा का दिवस मावळला रात्र झाली, की सर्वत्र अंधार पडतो, आपल्या आयुष्यामध्ये पण असंच काहीसं असतं.
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "आपण एखादं काम हातात घेतलं आणि ते पूर्ण झालं म्हणजे त्या कामाचा सूर्य मावळला, पुन्हा नवीन ऊर्जा नवीन दिवस नवीन काम हाती घेऊन, नवीन कामाचा सूर्योदय करून पुन्हा मेहनत करायला कष्ट करायला तयार राहायचं, यालाच जीवन प्रवास म्हणतात का ?बरेच वेळेला हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही, मग थोडं थांबून ते रात्र सरू द्यायची आणि पुन्हा जोमाने त्या कामाला लागायचं, यालाच यशाची गुरुकिल्ली म्हणतात का ?सगळ्यांना सगळं जमेल असं नाहीये, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कसं कळेल की आपल्याला ते जमतं आहे की नाही, आणि प्रामाणिक प्रयत्न केला तर ते जमेल असं मला वाटतं."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "माझा अनुभव असा आहे की मी कुठलीही नवीन गोष्ट हातात घेतली की माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण व्हायची कदाचित अजूनही ती भीती निर्माण होते, पूर्वी त्या भीतीवर कशी मात करायची ते कळत नव्हतं, मग हाती घेतलेलं काम अर्धवट सोडून दुसरे काम करायला सुरुवात करायची, पण आता मला कळलं की प्रामाणिक प्रयत्न केला तर त्या भीतीवर मातही करता येईल आणि आपल्याला ते काम व्यवस्थित रित्या करता ही येईल.
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला छोटे छोटे task देत असतो, आणि ते task काहीही असू शकतात, खूपच छोटे टास्क असू शकतात, मग तो सकाळचा चहा अगदी व्यवस्थित करण्यापासून, तर मोबाईल फोनला चार तास हात लावायचा नाही, किंवा रस्त्यात भेटेल त्याला स्माईल करायचं, wish करायचं , किंवा दिवसातून दहा ग्लास पाणी प्यायचं , आणि मग एकदा का दिवस मावळला की स्वतःलाच शाबासकी द्यायची, किंवा मग स्वतःला सांगायचं ठीक आहे आज नाही जमलं तुला काहीही हरकत नाही उद्यापासून सुरू कर, हाच formula आयुष्यामध्ये मोठ मोठी स्वप्न साकारण्यासाठी वापरता येतो."