छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि गाजलेली मालिका 'आई कुठे काय करते' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पाच वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केल्यानंतर ही मालिका आता संपणार आहे. मालिका संपत असल्याने प्रेक्षकांबरोबरच कलाकारही भावुक झाले आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्टार प्रवाहच्या ऑफिशियल सोशल हँडलवरुन मिलिंद गवळींचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते म्हणतात, "आई कुठे काय करते आणि अनिरुद्ध हे ऐकल्यावर माझ्या डोक्यात मीच येतो. कारण, पाच वर्ष मी अनिरुद्ध देशमुख जगलो आहे. स्टार प्रवाहने त्याला मोठं केलं. मिलिंद गवळी खूप वर्षांपासून मिलिंद गवळी होता. पण, अनिरुद्ध देशमुख इतका फेमस होईल याचा मी कधीच विचारच केला नव्हता. इतक्या वर्षात मला जी प्रसिद्धी मिळाली ती मी आनंदाने जगलो. पण, अनिरुद्ध देशमुख ही माझ्या करिअरमधील भन्नाट भूमिका आहे. खरं तर अनिरुद्ध हिरो नाही आणि व्हिलनही नाही. ते ह्युमेन कॅरेक्टर आहे. अनिरुद्ध हा आपल्या आजूबाजूला सगळीकडे असणारं एक कॅरेक्टर आहे. जो हसतो, रडतो, कष्ट करतो, खोड्या काढतो, कुटुंबासाठी थोडी चिटिंग करतो. तो कुठेच परफेक्ट नाही. पण, तो आपल्या आजूबाजूलाच असणारा एक आहे. त्यामुळे तो कनेक्ट होतो".
"पाच वर्ष मी सातत्याने अनिरुद्ध देशमुख करतोय. मालिका असल्याने महिन्यातले २२ दिवस अनिरुद्ध देशमुख जगत होतो. बऱ्याचदा मालिका करताना आपण जे कॅरेक्टर करतोय त्यातून डिटॉक्स करायला वेळ मिळायचा. पण, इथे मला तो मिळाला नाही. त्यामुळे मी अनिरुद्ध जगत गेलो. या पाच वर्षात मिलिंद गवळीमध्येही तो अनिरुद्ध भिडला आहे. अनिरुद्धला बाहेर काढणं माझ्यासाठी थोडं कठीण जाणार आहे. स्टार प्रवाह, आई कुठे काय करते आणि अनिरुद्ध देशमुख यांना वेगळं करता येणार नाही", असंही पुढे मिलिंद गवळी म्हणतात.
२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली होती. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत होती. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.