‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. ही मालिका आली तशी अल्पावधीत लोकप्रिय झाली. अरूंधती, अनिरूद्ध, संजना अशा मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांची मनं जिंकलीत. गेल्या 23 डिसेंबरला या मालिकेला 3 वर्षे पूर्ण झालीत. याचं जंगी सेलिब्रेशनही झालं. अशात आता अरूंधतीची (Arundhati) पोस्ट चर्चेत आली आहे. होय, या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) हिनं एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मधुराणीनं अरूंधतीची भूमिका साकारली आहे. मधुराणी गातेही गोड. रिअल लाईफमध्ये ती एक उत्तम गायिका आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या भागात अरुंधती एक अंगाई गाताना दिसली होती. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी गायलेली अंगाई मधुराणीनं गायली आहे.
मधुराणीने मालिकेतील अंगाई गातानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सलीलने बांधलेली गाणी गाणं हा गाणाऱ्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकदा काय झालं ह्या सुंदर चित्रपटातली ही हळवी अंगाई. आई कुठे काय करते मध्ये माझ्या नशिबाने मला अनेक गाणी गाण्याची संधी मिळते आणि त्या निमित्ताने नवीन गाणी बसवली ही जातात. गाण्याचं धाडस केलंय. गोड मानून घ्या....,’ असं मधुराणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सलील कुलकर्णी यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरुन अरुधंतीने गायलेल्या अंगाईचा व्हिडीओ शेअर करत तिचं कौतुक केलं होतं. याशिवाय चित्रपटातील त्यांची अंगाई घेतल्याने त्यांनी मालिकेच्या टीमचे आभारही मानले होते.