ट्रोलिंग हे आता नवं राहिलं नाही. अनेक सेलिब्रिटी रोज या ना त्या कारणानं ट्रोल होतात. आता तर मराठी मालिकेतील कलाकारही ट्रोल होत आहेत. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरूंधती अर्थात अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिचंच उदाहरण घ्या. मधुराणीने लेकीसोबतचे ट्रिपचे फोटो शेअर केलेत आणि एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मधुराणी गप्प बसली नाही. तिने या ट्रोलरला असं काही सुनावलं की त्याची बोलती बंद झाली.
तर मधुराणी प्रभुलकर यांनी इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर केलेत. ‘आई आणि मुलीचा व्हेकेशन टाईम’, असं सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिलं. या फोटोत मधुराणी आपल्या मुलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. पण एका युजरने मात्र या फोटोतील मधुराणीचे मॉडर्न कपडे पाहून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुकमधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असं नाही. मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात,’ असं या युजरने लिहिलं.
या युजरला ट्रोल करणाऱ्या युजरला मधुराणीने चांगलंच सणसणीत उत्तर दिलं. ‘मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात नं...,’असं तिने लिहिलं. मधुराणीच्या या कमेंटनंतर अनेक युजर्सनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे.
मधुराणीने सध्या ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगमधून छोटासा ब्रेक घेतला आहे. सध्या ती मुलीबरोबर सुट्टीचा आनंद घेत आहे.