‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade). ऐतिहासिक मालिकांमुळे विशेष लोकप्रिय झालेल्या अश्विनीचा या मालिकेतील नवा अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावला आहे. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’मधील अनघा अल्पावधीत लोकप्रिय झाली. आज सोशल मीडियावर अश्विनीचा मोठा चाहतावर्ग आहे. याच अश्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत तिने याबद्दलची माहिती दिली आहे. नुकतंच अश्विनीच्या भावाचं निधन झालं. भावाच्या आठवणीत तिने एक पोस्ट लिहिली आहे. सोबत भावासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
पोस्टमध्ये ती लिहिते, ‘एखादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय? त्याच्या चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला माणूस? प्रत्येक माणूस हा स्वत:चा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते. मंगेशची ‘दिदू’ झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसहित स्विकारता आलेच नाही कदाचित. माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून...पण वेळ पुढे सरकलेला असतो. मंगेश.. आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला..’
अश्विनीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे तसेच तिला धीर देखील दिला आहे. कोरोना काळात अश्विनीच्या वडिलांचं निधन झालं होतं.