‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण देविका तुम्हाला ठाऊक असेलच. अभिनेत्री राधिका देशपांडे ( Radhika Deshpande) ही भूमिका साकारते आहे. सध्या याच राधिकाचा ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय. होय, सरकारी बाबूंवर ही मराठमोळी अभिनेत्री जाम भडकली आहे. एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला आहे. बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी राधिका प्रयत्न करतेय. मात्र कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार कागद, दोन सह्या, एक शिक्का... अशा आशयाच्या पोस्टमध्ये आपला संताप तिने बोलून दाखवला आहे.
राधिकाची पोस्ट तिच्याच शब्दांत...
चार कागद, दोन सह्या, एक शिक्काताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या."देश बदल रहा है, तरक्की हो रही है", ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी. विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी "चल हट" म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.
२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते. असो.आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते. पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे.मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.*मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते.
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा.~ राधिका देशपांडे