'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक. एका साध्या गृहिणीची आणि घरातल्या सगळ्यांसाठी धडपडणाऱ्या आईची गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली होती. अत्यंत साधी पण वेळप्रसंगी तितकीच कठोर होऊन निर्णय घेणारी अरुंधती प्रेक्षकांना भावली होती. या मालिकेतील अरुंधतीप्रमाणेच इतरही पात्रांना लोकप्रियता मिळाली. 'आई कुठे काय करते'मध्ये ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
मालिका संपल्यानंतर आता अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. नुकतंच अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभिनेत्रीने उत्तरं देत त्यांच्याशी संवाद साधला. या सेशनमध्ये अपूर्वाला तिच्या स्कीन केअर रुटीनपासून ते लग्नाच्या प्लॅनिंगबाबत चाहत्यांनी प्रश्न विचारले.
एका चाहत्याने अपूर्वाला "तू लग्न कधी करणार?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला अपूर्वाने उत्तर दिलं आहे. नऊवारी साडी आणि साज शृंगार केलेला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो अपूर्वाने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत "चांगल्या स्थळाच्या प्रतिक्षेत आहे", असं उत्तर अपूर्वाने दिलं आहे. अपूर्वाची ही इन्स्टास्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.