'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झालं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या भूमिकेमध्ये समरसून गेले आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अर्चना पाटकर (archana patkar). या मालिकेत सध्या अर्चना अरुंधतीच्या सासूची म्हणजेच कांचनीच भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे अर्चना यांनी या भूमिकेला उत्तमरित्या न्याय दिला असून त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये त्या पार्टी मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळतं.
मालिकेतमझ्ये खाष्ट पण तितक्याच प्रेमळ सासूची भूमिका साकारून अर्चना पाटकर यांनी कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे मालिकेत गृहिणी असलेल्या अर्चना खऱ्या आयुष्यात कमालीच्या बिंधास्त आणि बेधडक आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अर्चना यांनी अलिकडेच त्यांच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या पार्टीमध्ये त्यांचा लूक पाहून चाहतेदेखील थक्क झाले आहेत.
अलिकडेच अर्चना पाटकर यांनी त्यांच्या स्विमिंग ग्रुपला भेट दिली. तब्बल २ वर्षानंतर त्यांचा संपूर्ण ग्रुप एकत्र जमला होता. यावेळी सगळ्यांनी मिळून छान पार्टी केली. या पार्टीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दरम्यान, मालिकेत कायम साडीत वावरणाऱ्या कांचन म्हणजेच अर्चना या पार्टीमध्ये वेस्टर्न लूकमध्ये दिसून आल्या. विशेष म्हणजे त्याचा हा लूकदेखील नेटकऱ्यांना भलताच आवडला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो चर्चिला जात आहे.