कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर मुहुर्त गाठत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर काही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, अभिनेता निखिल राजेशिर्के यांच्यानंतर आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरू आहे. कौमुदी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून नुकतंच 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिचं केळवण केलं.
मालिका संपल्यानंतर कौमुदीच्या घरी तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नाआधी 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिच्या केळवणाचा थाट केला होता. अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव, अश्विनी महांगडे, सुमित ठाकरे या कलाकारांनी कौमुदीचं केळवणं केलं. याचे फोटो शेअर करत कौमुदीने खास पोस्टही लिहिली आहे.
कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. कौमुदी आकाशसोबत सात फेरे घेत संसार थाटणार आहे. दरम्यान, कौमुदीने अनेक मालिका, नाटक यांमध्ये काम केलं आहे. 'आई कुठे काय करते'मध्ये तिने आरोहीची भूमिका साकारली होती.