Join us

साधीभोळी होती अनिरुद्धच्या रिअल लाइफ आई; फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:32 AM

Milind gawali: अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळींनी रंगपंचमीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आईचा फोटो पोस्ट करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). आतापर्यंत या मालिकेत प्रत्येक सण, उत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी होळीचा उत्साहदेखील तितकाच दिसून येत आहे. यामध्येच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळींनी रंगपंचमीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आईचा फोटो पोस्ट करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"रंगपंचमी शेवटी आठवणी राहतात, प्रेमाची माणसं आपल्याला सोडून जातात आणि मागे ठेवून जातात छान आठवणी,सप्तरंगी आठवणी,त्याच आठवणींवर आपल्याला आपला आयुष्य जगण्याची उमेद मिळते,आयुष्य बेरंग नाहीतर खूप रंगीबेरंगी आहे. एकमेकांवर प्रेम करावे, सगळ्यांचं चांगलं चिंताव, लोकांना जितकी मदत करता येईल तेवढी करावी, लोकांच्या आयुष्यात रंग भरावेत, अशाच पद्धतीने माझी आई तीच आयुष्य जगली, रंगपंचमीच्या दिवशी तिची खुप म्हणजे खूपच आठवण येते", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "पण माझ्या आजूबाजूच्या ज्या ज्या माउल्या आहेत त्या सगळ्यांच्या रूपात माझी माय माझ्या आयुष्यामध्ये रंग भरत असते. जर तुमची माय माऊली तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जगात सगळ्यात भाग्यवान आहात, रंग भरा तिच्या आयुष्यात, आजच्या दिवशी रंग लावा तिच्या गालाला, तिझ्या आशीर्वादानेच आयुष्य सुख शांती समृद्धी आरोग्य या सगळ्याने रंगून जाईल तुमचं."

दरम्यान, सध्या मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा नक्कीच दिला आहे. पण, इतरांनाही  आपल्या आईचं महत्त्व पटवून दिलं आहे.  

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनसेलिब्रिटीआई कुठे काय करते मालिका