Join us

'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- "तिचे ९०-९५% नवस तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:43 IST

आई कुठेे काय करते मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या आईला भावुक पत्र लिहिलंय (milind gawali)

आगामी मराठी सिनेमा 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'ची सर्वांना उत्सुकता आहे. त्यानिमित्त अनेक मराठी कलाकार त्यांच्या मनातील भावना पत्राद्वारे व्यक्त करत आहेत. अशातच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळींनी यानिमित्त त्यांच्या आईला पत्र लिहिलंय. मिलिंद गवळी लिहितात, "ज्या माणसांमध्ये इनोसन्स असतो त्या माणसाला देव लवकर पावतो. जी माणसं हुशार असतात किंवा अती हुशार असतात, त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात, देव आहे की नाही आहे."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "कधी कधी मला असं वाटतं की अशा अतिहुशार लोकांच्या समोर प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याला प्रश्न विचारून विचारून ते देवालाच भंजाळून सोडतील. मी माझ्या आजीची आणि माझ्या आईची निरागस निष्पाप देव भक्ती पाहिली आहे. त्या दोघींना काही हवं असेल तर ते कोणाकडेही मागत नसे, एखाद्या मंदिरात जाऊन त्या मूर्ती समोर एक नवस बोलत असे, मग देवाला सांगितलेलं काम पूर्ण झालं किंवा ती वस्तू त्यांना मिळाली, की मग नवस फेडायला जायचं आहे, या गोष्टीचा हट्ट करायच्या."

मिलिंद गवळी पुढे सांगतात की, "महिना दोन महिने सतत नवस फेडायला जायचं आहे हा विषय काढायच्याच. मग काय मी पण जायचो त्यांच्याबरोबर त्यांनी बोललेला नवस फेडायला, मग ते शिर्डी असो शेगाव असो अक्कलकोट असो गाणगापूर असो कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची महालक्ष्मी असो, पंढरपूरचा विठ्ठल असू दे. त्यांच्याबरोबर माझं सुद्धा महाराष्ट्रातल्या असंख्य देवस्थानांचं दर्शन घडायचं. माझी सहल किंवा पिकनिक सोमेश्वर त्रंबकेश्वर सज्जनगड अष्टविनायक मुंबईत सिद्धिविनायक महालक्ष्मी, गणेशपुरीचा नित्यानंद बाबांचे मंदिर इथेच असायची. देवीला खूप आधीच साडी, खण, घेऊन ठेवलेली असायची, मग पुजाऱ्याला थोडं पैशाचा आमिश  देऊन देवीला ती नेसवली जायची. आणि माझ्या आईचे 90-95% नवस तर माझ्यासाठीच असायचे."

शेवटी 'मु.पो. देवाचं घर' सिनेमाविषयी मिलिंद गवळी लिहितात की, "आणि आज मी जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा जे काही माझ्या आयुष्यात घडून गेलंय किंवा जे काही घडतंय, हे त्या परमेश्वरी शक्तीशिवाय अशक्यच होतं, काल असंच मला निष्पाप निरागस व्हायची संधी मिळाली, सुबोध बारे यांचा फोन आला आणि "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या आगामी मराठी चित्रपटातल्या मायरा सारखं 'देवाच्या घरी' पत्र पाठवायची संधी मिळाली, मग काय मी लगेच माझ्या आईला पत्र लिहिलं."

"मुक्काम पोस्ट देवाचं घर"नावाचा गोड निरागस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कथा दिग्दर्शक संकेत माने, निरागस मायरा, मंगेश देसाई, सविता मालपेकर, प्रथमेश परब असे अनेक गोड कलावंत या चित्रपटात आहेत, आता परत एकदा आपल्या सगळ्यांना innocent होण्याची गरज आहे, या internet च्या राक्षसामुळे आपण सगळेच "अति" हुशार, अतिशहाणे झालो आहोत,  OTT वरचा रक्तपात, विभत्स, अश्लील बघून झालं असेल, तर आता "मुक्काम पोस्ट देवाचं घर" बघूया का ?" 

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेतामराठी चित्रपट