आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या एका सिनेमाचा अनुभव शेअर केलाय. या सिनेमात मिलिंद गवळींनी खऱ्या नागांसोबत शूटींग केलंय. मिलिंद गवळी लिहितात, "काळभैरव" सतीश रणदिवे दिग्दर्शित काळभैरव चित्रपट संपूर्णपणे कोल्हापुरात शूट झाला, माझा पहिला मराठी चित्रपट १९९४ ला "निलांबरी" हा सतीश रणदिवे यांनी दिग्दर्शित केला होता, त्यानंतर मी सतीशजीं बरोबर खूप चित्रपट केले, त्यातला हा एक अतिशय सुंदर धार्मिक चित्रपट, आणि नागा विषयीच्या आपल्या अंधश्रद्धा दूर करण्याचा हा चित्रपट,माझं शूटिंग होतं 35-40 दिवस, त्याच्यापेक्षा नागाच शूटिंग दोन-चार दिवस जास्तच होतं."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "कोल्हापूरला सेटवर सतत नाग असायचा, माझा परम जीवस्यकंठश्य मित्र वसंत हंकारे, ज्याचं व्यक्तिमत्व एका वाघासारखा आहे, पण नाग म्हटलं की त्याला घाम फुटतो, phobia आहे सापांचा, या चित्रपटात वसंताने एक भूमिका केली होती, कोल्हापूरला शूटिंगला आला त्याला कल्पना नव्हती की सेटवर नाग आहे, दुपारी आम्ही एकत्र जेवायला बसलो, त्या नाग वाल्याने नागाची पेटी त्याच्या खुर्चीच्या खाली ठेवली होती, वसंतला त्याची कल्पनाच नव्हती, शांतपणे आपला जेवत बसला होता, मग कुणीतरी सांगितलं "अरे तुझ्या खुर्चीच्या खाली नाग आहे", हे ऐकल्यावर पाच दहा फूट उंच उडाला आणि तिकडनं पळून गेला."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "एका सीनमध्ये मी झोपलो असताना, नाग माझ्या अंगावर रांगत येतो, आणि माझ्या चेहऱ्यावर फणा काढून उभा राहतो, माझे डोळे मिटले असतात, पण माझ्या कानात सापाचा फुत्कारा ऐकू येत होता, त्या क्षणी माझ्या हृदयाचे अनेक ठोके चुकले, मी अनेक वेळा फुशारक्या मारल्या आहेत की मी नाही घाबरत नागाला, पण नाग जेव्हा तुमच्या छातीवर बसतो, तोंडासमोर फणा काढतो, तेव्हा मनामध्ये काय होतं, हे शब्दात मांडणं कठीण आहे, तुम्ही कधीतरी असा अनुभव घेऊन बघा,कोल्हापुरात पंचगंगा च्या तीरावर एक काळभैरवाच मंदिर अतिशय सुंदर लोकेशन आहे, तिथे या चित्रपटाचे बरेच शूटिंग झालं."
मिलिंद गवळी शेवटी विजय चव्हाण यांच्याबद्दल लिहितात, "या चित्रपटामध्ये विजू मामा( विजय चव्हाण) हे मेन विलन आहेत, विजू मामा म्हणजे अगदी भन्नाट माणूस, अशी माणसंच दुर्मिळ असतात, जसा कोकणातला अगदी हापूस आंबा, विजू मामां बरोबर सिनेमा करायचा म्हणजे एक आनंददायक प्रवास, सतत हसवत राहणे हा त्यांचा स्वभाव होता, माझ्या खोड्या काढायला तर त्यांना खूप आवडायचं, लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांचे अगदी जवळचे मित्र, त्यांना फोन करून करून ते दोघं मिळून माझे खोड्या काढायचे,विजू मामा कधी मोबाईल वापरायचे नाही, ज्या सिनेमात काम करायचे त्या सिनेमातल्या कलाकारांच्या फोनवर त्यांचे निरोप यायचे, एक दिवस माझा फोन मी दिवसभर बंद ठेवला होता, तर संध्याकाळी माझ्यावर चिडले, मला म्हणाले फोन का बंद ठेवला आहेस, माझे सगळे फोन्स, निरोप,मेसेजेस तुझ्या फोनवर येत होते. आयुष्यभर मोबाईल न वापरलेला कलाकार."