Join us

'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:01 PM

'आई कुठे काय करते' मालिकेला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. टीआरपीच्या शर्यतीबरोबरच 'आई कुठे काय करते' मालिकेने प्रेक्षकांची मनंही जिंकली. या मालिकेतील देशमुख कुटुंबावरही चाहते तितकंच प्रेम करतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून अभिनेते मिलिंद गवळी घराघरात पोहोचले. 'आई कुठे काय करते' मालिकेला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळींनी 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे. 

“मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे घड्यारं तुला भीती कोणाची परवा बी कुणाची”बरोबर चार वर्षांपूर्वी २०१९ डिसेंबर महिन्यात आपल्याला आता सिरीयलचं शूटिंग ठाण्यामध्ये करायचा आहे म्हणून आपण एकदा ती शूटिंगची जागा बघायला जाऊ असं मनात ठरवलं. शूटिंग सुरू व्हायच्या आधी सेट बघायला मी आलो, सेटचं काम जोरात चालू होतं, आमचे “आई कुठे काय करते” या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी पालेकर यांची जागा शूटिंगसाठी ठरवली.आणि ठाण्यामध्ये ओवळ्या जवळ पानखंडा गावात ही जागा आहे. मी शोधत शोधत तिथे पोहोचलो. कोकणातल्या गावातले जसे रस्ते आहेत तसाच रस्ता या पालेकर बंगल्याकडे जातो. त्यात पानखंड रोडवरून थोडं पुढे गेलं तर एक छान नदी आहे. ओढा, झरा आहे. हिरवंगार डोंगर आहे. अगदी गावातलं वातावरण आहे. गजबजलेल्या ठाण्या शहरातील , रहदारीच्या घोडबंदर रोडला लागून, इतकी सुंदर निसर्गरम्य जागा असेल असं कोणालाही वाटणारच नाही.

मग सिरीयलसाठी या जागेचं या बंगल्याचं नाव ठेवलं गेलं "समृद्धी बंगला". सात डिसेंबर २०१९ पासून शूटिंग सुरू करायचं ठरलं होतं. त्याच्याआधी सिरीयलचं मॉक mock शूटिंग झालं होतं. Trial shooting, त्यात channel ने माझ्या भाषेवर काही सुधारणा करायला सांगितल्या होत्या . Mock shoot मध्ये मी असं म्हटलं होतं “तू उशिरा का आली” तर तसं न म्हणता “तू उशिरा का आलीस” असं म्हणायला पाहिजे होतं...मग ते सगळं corrections करून पुन्हा शूट करून त्यांना पाठवलं.

जरा दडपणच आलं होतं. पण, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार, रमेश भाटकर, विजय चव्हाण, डॉक्टर लागू , निळू फुले, अरुण सरनाईक या सगळ्यांबरोबर काम करताना जे दडपण आलं होतं त्यापेक्षा हे फारच कमी होतं...

२७डिसेंबर २०१९ मध्ये पहिला एपिसोड मोठ्या पडद्यावर राजेनशाही आणि पूर्ण टीम बरोबर आम्ही सगळ्यांनी समृद्धी बंगल्यातच एकत्र बघितला आणि राजनशाहींनी माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. तेव्हा कुठे मनाला बरं वाटलं...पण, दडपण मात्र काही कमी झालं नव्हतं. आता त्या गोष्टीला चार वर्ष होऊन गेली आहेत. तरीसुद्धा कामाचं एक वेगळं दडपण असतंच...

आज १२५० एपिसोड शूट करत असतानासुद्धा सीनच्या आधी थोडं दडपण आलं. म्हणून, त्याच समृद्धी बंगल्याच्या अंगणात फेऱ्या मारत असताना आमच्या राजू शिलू का आणि हा माझा व्हिडिओ काढला. मग माझा आवडता गाणं त्या व्हिडिओमध्ये टाकला आणि ही पोस्ट तयार केली. 

मिलिंद गवळींच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळीटिव्ही कलाकार