सध्या छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (AAI KUTHE KAY KARTE) ही मालिका चांगलीच गाजत आहे. जवळपास ३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या तीन वर्षात मालिकेत अनेक बदल झाले. काही कलाकार या मालिकेतून बाहेर पडले तर काही नव्या कलाकारांची यात एन्ट्री झाली. यातलीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत येत आहे. या अभिनेत्रीने नुकतंच वणीच्या सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील विमल साऱ्यांच्याच लक्षात असेल. ही भूमिका अभिनेत्री सीमा घोगले (seema ghogale) हिने साकारली आहे. अलिकडेच सीमाने सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. सोबतच तिच्या भावनाही व्यक्त केल्या.
"माझा देवावर प्रचंड विश्वास आहे.अडचणीच्या वेळी किंवा खूप आनंदाच्या क्षणी त्याचं अस्तित्व माझ्या आजूबाजूला असलेलं मला नेहमी जाणवत आलंय. पण म्हणून सगळं देवावर मी कधीच सोडलं नाही. मी प्रयत्न करत गेले आणि आईबाबांसोबत देव ही सदैव माझ्या सोबत राहिला. पण म्हणतात ना तुमची वेळ यावी लागते त्याशिवाय त्या देवाचं दर्शन नाही लाभत; तसच काहीसं झालं. माझ्या घरात देवीच वारं आहे गेली जवळजवळ २२/२३ वर्ष मी नवरात्रीचं व्रत करते. दरवेळी हीचं इच्छा असते साडे तीन शक्तीपीठ करायची पण कामाचा व्याप आणि योग हे काही जुळून येत नाहीय. आता ते जुळून येईल असं वाटतंय, सुरुवात झालीय, पहिल्यांदा वणीच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता आलंय... इतका आनंद झालाय की तो शब्दात वर्णन करणं कठीण आहे.माझ्या चेहऱ्यावर ते समाधान तुम्हाला दिसलंच असेल....पुढचा योगही नक्कीच जुळून येईल खात्री आहे", असं सीमाने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबतच देवदर्शनाचे फोटोही शेअर केले आहेत.