स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. अरूंधती, अनिरूद्ध, संजना यांच्याभोवती फिरणाऱ्या या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मालिकेत आत्तापर्यंत अनेक अनपेक्षित वळणं आलीत आणि या वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पण आता हीच मालिका ट्रोल होतेय. होय, कारण आहे अनिरूद्ध.
अरूंधती देशमुखांचं घर सोडून गेल्यापासून अनिरूध्द खवळला आहे. अरूंधती आणि आशुतोषची मैत्रीही अनिरूद्धला सहन होईनाशी झाली आहे. साहजिकच, अनिरूद्ध सध्या चवताळलेला आहे. अशात अभिच्या मनात अरूंधतीविषयी शंका उपस्थित करून अभि व अरूंधतीच्या नात्यात दुरावा आणण्याचं काम त्याने चालवलं आहे. अरूंधतीविषयी सतत वाईट बोलून तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न अनिरूद्ध करतो आहे.
सध्या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात अनिश व ईशा एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतात यावरून अनिरूद्ध खवळलेला दिसतोय. तुम्हाला इतका प्रॉब्लेम असेल तर ईशाचं कॉलेज बदला. अनिश त्याच कॉलेजमध्ये जाईल, असं आशुतोष त्याला ठणकावून सांगतो. पण अनिरूद्धची वायफळ बडबड सुरूच आहे. मुळात घटस्फोट झाल्यावर अरूंधती खूप पुढे निघून गेली आहे आणि मी तिथेच आहे, ही गोष्ट अनिरूध्दला अस्वस्थ करतेय. त्यामुळे सतत कडवट , टोकांचं बोलताना तो दिसत आहे. त्याचं हे वागणं प्रेक्षकांनाही हैराण करतेय आणि म्हणूनच ‘अनिरूद्ध वेडा झाला आहे,’ असं म्हणत लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
मालिकेतील सध्याचा ट्रॅक पाहूनही युजर्स कन्फ्युज आहेत. इथे आई सोडून बाकी सगळ्या विषयावर भाष्य सुरू आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे.एकीकडे अनिरूद्ध सगळ्यांसमोर वाईट ठरत असताना संजनावर मात्र प्रेक्षक फिदा आहेत. आधी संजना ट्रोल व्हायची. पण आता तिचं कॅरेक्टर, तिचं बदलेलं रूप पाहून प्रेक्षक खूश्श आहेत. तू आता आम्हाला हळूहळू आवडायला लागली आहेस, अशा कमेंट प्रेक्षक करत आहेत.