गेल्या काही दिवसांपासून मराठी टेलिव्हिजन विश्वात एकाच विषयावर चर्चा सुरु होती ते म्हणजे 'अरुंधतीचं लग्न'. 'आई कुठे काय करते' मालिकेतील आईची भूमिका साकारणाऱ्या अरुंधतीचं अखेर दुसरं लग्न नुकतंच पार पडलं. अरुंधती खरंच लग्न करणार का, का करणार यावरुन बरंच ट्रोलिंगही झालं तर अनेकांनी कौतुकही केलं. दरम्यान अरुंधतीची ऑनस्क्रीन नणंद विशाखा म्हणजेच अभिनेत्री पूनम चांदोरकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
मध्यम वयातील घटस्फोटित महिलेने दुसरं लग्न करायचं म्हणलं की आजही समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. त्यातच मालिकांमध्ये अशा काही गोष्टी दाखवल्या की लोक त्या मालिकेला हमखास नावं ठेवतात. 'आई कुठे काय करते' मालिकेबाबत नेमकं तेच घडलं. मालिकेत अरुंधतीचं दुसरं लग्न दाखवणार म्हणल्यावर प्रचंड टीकाटिप्पणी झाली. मात्र अखेर लग्न झालंच. यावर अभिनेत्री पूनम चांदोरकर लिहिते, 'मागचा एक महिना फक्त अरुंधती आणि अरुंधतीच लग्न.....हा एकच विषय सगळ्यांसाठी होता अरुंधती लग्न नक्की करणार का ..तर अरुंधतीला लग्न करण्याची गरज काय आहे ? इथपर्यंत सगळ्या चर्चा आणि नुसत्या चर्चा ...पण या सगळ्यातून फायनली अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न संपन्न झालं ..खूप मजा आली..आणि एकंदर एक व्यक्ती म्हणून विचार करताना असं वाटलं की फक्त सिरीयलसाठी नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना मानाने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे मग तो अधिकार हिरावून घेणारे आपण कोण हो ना ....'
अनेकदा चित्रपट, मालिकांचं खऱ्या आयुष्यातही अनेक जण अनुकरण करतात. थोडक्यात काय तर ते समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतात. 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीचं लग्न दाखवणं हे देखील एक शिकवणच देऊन गेलं आहे. मात्र मालिकेत दाखवली जाणारी अतिशयोक्तीही तितकीच धोक्याची असते. त्यामुळे याचा समतोल राखणं गरजेचं आहे.