पाठवणीवेळी अरुंधतीने तिखट शब्दात केला अनिरुद्धचा पाणउतारा, म्हणाली, 'अरेरे भरल्या घरात...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:21 PM2023-03-14T15:21:35+5:302023-03-14T15:22:11+5:30
अनिरुद्ध पाठवणीवेळीही अरुंधतीला त्रास देतो तेव्हा अरुंधती तिखट शब्दात त्याचा पाणउतारा करते.
लोकप्रिय मराठी मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मध्ये अरुंधती आणि आशुतोषचं अखेर लग्न झालं आहे. दोघंही आता सुखाचा संसार करण्यासाठी सज्ज आहेत. अनेक अडथळे पार करत दोघांच्या नात्यात आता आनंदाचे क्षण आले आहेत. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नामुळे मालिकाही दिवसेंदिवस गाजत आहे. दरम्यान अरुंधतीची पाठवणी करताना अनिरुद्ध नावाचं विघ्न त्यांच्यासमोर आलंच. तेव्हा अरुंधतीनेही न डगमगता अनिरुद्धला त्याची जागा दाखवून दिली आहे.
काही दिवसांपासून मालिकेत अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाला तीव्र विरोध बघायला मिळाला. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लग्नाला अनिरुद्ध आणि त्याची आई कांचनमाला यांनी खूप विरोध केला, तिला शेवटपर्यंत त्रास दिला. तरी सासू सासऱ्यांनी कन्यादान करावं अशी अरुंधतीची इच्छा असते शेवटी सासूचंही मन पाझरतं आणि त्या लग्नात सहभागी होतात. अनिरुद्ध मात्र पाठवणीवेळीही अरुंधतीला त्रास देतो तेव्हा अरुंधती तिखट शब्दात त्याचा पाणउतारा करते.
अरुंधती म्हणते, 'झालं बोलून? बाजूला व्हा... माझे यजमान माझी खाली वाट पाहत आहेत. अशा परक्या विवाहित बाईची वाट अडवताय तुम्ही. बाजूला व्हा.. माझ्या आयुष्याची सर्कस झाली. पण असं झालं नसतं तर बरंच झालं असतं. माझ्या सर्कशीत माझ्या आजूबाजूला माझी म्हणता येतील अशी माझी चार माणसं तरी आहेत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. माझा हात धरून मला आधार देणारी, पण तुमचं काय? तुम्ही एकटे पडले आहात अनिरुद्ध.''
''आता एक काम करा तुमचा हा जो गैरसमज आहे ना, सिंहासन असो वा नसो राजा मीच. या गैरसमजात आयुष्यभर आनंदात राहा. आणि चुकून कधी तुम्ही आरशात पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यावर मुकूटच नाहीये. आपण राजाच नाहीये आणि आपली प्रजा आपली गुलामच नाहीये. तर उद्धवस्थ व्हाल तुम्ही. त्यामुळे मला नाही तर शुभेच्छांची गरज तुम्हाला आहे. अरे अरे अरे भरल्या घरात एकटे पडला आहात तुम्ही अनिरुद्ध, काळजी घ्या."
अरुंधतीचं तर लग्न झालं आता मालिकेत पुढे कोणतं वळण येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.