Join us

'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 1:25 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लवकरच अरुंधतीच्या आयुष्यात येणारे एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah)वरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारे एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. 

गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका म्हणून रसिकांसमोर येणार आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातील पहिले गाणे रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतील हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजिवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. 'मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपूर से सुखाचे चांदणे...' असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी ते लिहिले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने हे गाणे संगीतबद्ध केले असून गायिका विद्या करलगिकर यांनी गायले आहे.

आठवणींना मिळाला उजाळामालिकेतील या नव्या वळणाविषयी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने सांगितले की, 'खूप छान वाटतं आहे. मला जेव्हा १० वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली तिच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पाहिलं गाणं रेकॉर्ड करतेय तेव्हा आहे. आजिवासन स्टुडिओमध्ये पाउल ठेवल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १२ वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचे मी संगीत दिग्दर्शन केले होते तेव्हा रोज यायचे. आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा हा योग जुळून आला. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह