मराठी मालिकांचा मोठा चाहतावर्ग आहे. बऱ्याच वर्षांपासून अनेक मराठी मालिका सुपरहिट झाल्या आहेत. फक्त गृहिणीच नाही तर घरातील इतरही सदस्य आवडीने मराठी मालिका बघत असतात, फॉलो करत असतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या एपिसोडपासूनच लोकप्रिय झाली आहे. हिंदीतील 'अनुपमा' मालिकेसारखीच ही मालिका असली तरी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Kartein) टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. काही दिवसांपूर्वीच ही मालिका संपणार अशी चर्चा सुरु झाली. कारण या वेळेत एका दुसऱ्या नवीन मालिकेचा प्रोमो आला. मात्र आता 'आई कुठे काय करते' मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मालिका संपणार नसून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अरुंधती, संजना, आशुतोष आणि अनिरुद्ध या चौघांभोवती फिरणारी 'आई कुठे काय करते' मालिका यशाच्या शिखरावर आहे. मालिकेला तब्बल ५ वर्ष झाली आहेत. रोज संध्याकाळी 7.30 वाजता घराघरातून मालिकेच्या टायटलचा साँगचा आवाज येतो. मात्र स्टार प्रवाहने अचानक एका नवीन मालिकेचा प्रोमो दाखवला आणि त्याची वेळ 7.30 असणार असं जाहीर केलं. तेव्हा 'आई कुठे काय करते' संपणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तसंच गेल्या काही दिवसांपासून मालिका टीआरपी चार्टमध्ये खाली आली आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट होतो की काय अशीच शंका सर्वांना आली. मात्र तसं झालेलं नसून मालिकेच्या वेळेत बदल केला आहे. नवीन वेळेनुसार मालिका रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ मार्चपासून दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. संध्याकाळचा मेन टाईम स्लॉट काढून मालिका थेट दुपारी प्रक्षेपित केली जाणार असल्याने आता टीआरपीत काय फरत पडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका भेटीला येणार आहे. यामध्ये रेश्मा शिंदे महत्वाच्या भूमिकेत आहे.