‘आई माझी काळूबाई’ ही मालिका आणि यानिमित्ताने सुरु झालेला वाद आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला. सर्वप्रथम मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले. याचदरम्यान या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत अलका कुबल यांनी अनवधानाने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आणि आणखी एका नव्या वादाची ठिणगी पडली. यामुळे अलका व ‘आई माझी काळूबाई’च्या टीमला धमक्यांचे फोन येऊ लागले. या अनुषंगाने अलका यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.या भेटीदरम्यानचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. या भेटीदरम्यान उदयनराजे यांनी अलका यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवाय यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्याशी फोनवर चर्चा केली. दोघींचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती त्यांनी केल्याचे कळते.
मिळत आहे धमक्याया वादाच्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी प्राजक्ता गायवाडची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साता-यात सुरु असलेले ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. एका मुलाखतीत अनवधानाने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अलका कुबल यांना व ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या टीमला सतत धमक्यांचे फोन येतायत. याच पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी साता-यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
काय आहे वाद‘आई माझी काळूबाई’ या मालिकेची मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि मालिकेचा सहकलाकार रवी सांगळे यांच्यातील वादानंतर प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आले. प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकल्याचे सांगत अलका कुबल यांनी तिच्यावर अनेक आरोप केले होते. प्राजक्ता गायकवाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. प्राजक्ता सेटवर उशीरा येते, ना ना नखरे करते, असा आरोप अलका कुबल यांनी केला होता. परीक्षा असल्यामुळे चित्रीकरण करू शकत नाही, असे एक कारण प्राजक्ता सतत द्यायची. पण, सध्या कोरोना काळात सतत कोणत्या परीक्षा सुरु होत्या, असा प्रश्न कोणालाही पडेल. ती सतत सुट्टी मागायची. सेटवर अनेकदा उशीरा यायची. चित्रीकरणासाठी अनेक सीनिअर कलाकार तासनतास तिची वाट बघायचे. तिच्या उशीरा येण्याने अनेकदा चित्रीकरणाला उशीर झालाय. स्क्रिप्ट 15 दिवस आधी हवी, चित्रीकरणासाठी इतकेच दिवस येईल, अशा काय काय तिच्या अटी होत्या. तिची आई नको इतका हस्तक्षेप करायची. निर्माती म्हणून याचा प्रचंड मनस्ताप आम्ही सहन केला. सरतेशेवटी तिच्या जागी वीणा जगतापची मुख्य भूमिकेसाठी निवड केली, असे अलका कुबल यांनी सांगितले होते.
प्राजक्ताने दिले होते उत्तरअलका कुबल यांच्या या आरोपांना प्राजक्ताने उत्तर दिले होते. अलका कुबल यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र दीड महिन्यांपूर्वी सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर निर्मात्या या नात्याने त्यांनी कोणतीही ठोस व योग्य भूमिका घेतली नाही. त्यावेळी त्यांनी योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. अलका ताई वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता व आजही आहे. मालिकेतून मला काढण्यात आले नसून मी स्वत: मालिका सोडली. सहकलाकारासोबत झालेला वाद, त्याने मला केलेली शिवीगाळ या प्रकरणामुळे मी मालिका सोडली. सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर अलका ताईनी माझ्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते. योग्य भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र केवळ मालिका सुरु ठेवायची म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मला सगळे काही असह्य झाले तेव्हा मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. शिवीगाळ करणाºया सहकलाकाराने एका शब्दानेही माझी माफी मागितली नाही. त्याने मला आईबहिणीवरून शिव्या दिल्या, मात्र अलका ताई शांत राहिल्या. बघू, एवढेच त्या म्हणाल्या. केवळ मालिका सुरु राहण्यासाठी अशा लोकांना तुम्ही अभय देत असाल तर मी काम करू शकत नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले. यापूर्वी ‘मी स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत दोन वर्षे काम केले. त्याआधी ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत काम केले. माझे नखरे असते तर या मालिकेच्या निर्मात्यांनी मला सहन केले नसते. या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही. पण आता हे आरोप होत आहेत. माझ्या मते, हा फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे प्राजक्ता म्हणाली होती. चार महिने मी या मालिकेसाठी शूटिंग केले. पण अद्याप एक रुपया मला देण्यात आला नाही, असे ती म्हणाली होती.