रसिकांना पाहायला मिळणार सामान्य माणसाची अनोखी कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:21 PM2018-09-11T15:21:53+5:302018-09-11T15:22:34+5:30
आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे.
छोट्या पडद्यावर रसिकांना नेहमीच सुंदर कथा आणि उत्तम विनोद यांची पर्वणी दिली आहे. आता `बीचवाले – बापु देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे.
बॉबीचे वडील `पापाजी’ची भूमिका मिथिलेश चतुर्वेदी यांनी साकारली आहे. पापाजी ७० वर्षांचे आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्यात दृष्टीदोष असल्याने ते नेहमी लोकांना आपल्या डाव्या बाजूला उभे करतात. बॉबीचे दादाजी `बापूजी’ स्वातंत्र्य सैनिक होते. ते ९२ वर्षांचे आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले आहे. ते नेहमीच स्वतःला एका अवघड प्रसंगांत टाकायचे म्हणून महात्मा गांधींनी त्यांना `बीचवाले’ ही उपाधी दिली होती आणि त्यांनी आनंदाने ती आडनाव म्हणून लावायला सुरुवात केली होती.
बॉबी बीचवालेची पत्नी चंचल बीचवालेची भूमिका अनन्या खरेने साकारली आहे. तिला सगळेजण `ईएमआय भाभी’म्हणून हाक मारतात. ती जरा चंचल आहे आणि ती नेहमीच सगळ्या वस्तू ईएमआयवर खरेदी करत असते. ती नेहमी तिच्या नवऱ्याच्या मागे लागते आणि काहीही करून न परवडणाऱ्या आरामदायी वस्तूंची खरेदी करण्यासाठी मन वळवते.
बॉबीचा एक लहान भाऊ आहे – पपी बीचवाले. ही भूमिका मनोज गोएलने साकारली आहे, तो सेल्स एक्झिक्युटिव्ह. त्याची गांधीवादी तत्त्वे आहेत. उच्च विचारसरणी, अहिंसा आणि साधी रहाणी यावर त्याचा विश्वास आहे. पपीच्या बायकोची शीतल बीचवालेची भूमिका अंकिता शर्माने केलेली आहे. ही अतिशय अधिकार गाजवणारी व्यक्ती आहे, ती काहीशी आळशी आहे आणि ती नेहमीच नवऱ्यावर दादागिरी करत असते.
याशिवाय या मालिकेत ख्यातनाम अभिनेत्री शुभांगी गोखलेही काम करत आहेत. त्या चंचल आणि राजूच्या आईची रिटाची भूमिका साकारत आहेत. राजू हा चंचलचा जुगाडू भाऊ आहे आणि राजीव पांडे ही भूमिका साकारत आहेत.