दिग्गज अभिनेते अनुपम श्याम ( Anupam Shyam ) यांचे गत रविवारी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ते किडणीच्या आजाराने ग्रस्त होते. या आजारासोबत आर्थिक संकटाचा सामनाही करत होते. अनुपम यांचा भाऊ अनुराग श्याम यांनी त्यांच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. अनेक कलाकारांनी मदतीचा हातही पुढे केला होता. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) यानेही अनुपम यांना डायलिसिस सेंटर उभारण्याचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात त्याने हा शब्द पाळला नाही. अनुपम यांचा भाऊ अनुराग यांनी खुद्द हा दावा केला आहे.नुकतीच अनुपम श्याम यांचा भाऊ अनुराग श्याम यांनी ‘आजतक’ला मुलाखत दिली.
ते म्हणाले, ‘आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्याच महिन्यात आई गेली. तिच्या अंत्यदर्शनाला अनुपम प्रतापगडला जाऊ शकला नव्हता. यामुळे तो दु:खी होता. प्रतापगडमध्ये डायलिसिस सेंटर नाही, त्यामुळे अनुपमला तेथे नेणे धोकादायक होते. प्रतापगडमध्ये डायलिसीस सेंटर उघडावे, यासाठी अनुपमने खूप प्रयत्न केले होते. अगदी यासाठी तो आमिर खानला सुद्धा भेटला होता. आमिरने त्याला आश्वासनही दिले होते. पण प्रत्यक्षात आमिरने काहीच केले नाही. अनुपमची ही अखेरची इच्छा तो हयात असेपर्यंत पूर्ण झाली नाही. आमिरने नंतर आमचे फोन उचलणेही बंद केले.’
अनुपम श्याम यांना मन की आवाज प्रतिज्ञा या टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते ख-या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात. सदरादी बेगम, बँडिट क्वीन, हजार चौरासी की माँ, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, प्यार तो होना ही था, कच्चे धागे, नायक, स्लमडॉग मिलेनियर आणि मुन्ना सायकल सारख्या सिनेमात त्यांनी काम केले होते.