सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati)मध्ये ११ ऑक्टोबर रोजी ‘महानायक का जन्मोत्सव’ या विशेष भागात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी ‘परफेक्शनिस्ट’ आमीर खान आपला मुलगा जुनैद याच्यासह उपस्थित असणार आहे. गप्पांच्या ओघात आमिर खान(Aamir Khan)ने पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तो जे परोपकारी उपक्रम चालवतो, त्याची माहिती त्याने दिली.
महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर ही संस्था अविरत कार्य करत आहे. मराठी ही काही आमिर खानची मातृभाषा नाही, पण संस्थेचे काम करताना खेड्यापाड्यातील लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता यावा, त्यांच्याशी जवळीक साधता यावी म्हणून मराठी भाषा शिकण्याचा त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, हे बिग बींनी ओळखले आणि कौतुकही केले.
बिग बींनी केलं आमिर खानचं कौतुकअमिताभ बच्चन म्हणाले,''गावातल्या लोकांशी सहज संवाद साधता यावा म्हणून मराठी भाषा शिकण्यासाठी तू जे प्रयत्न केलेस, ते मी पाहिले आहेत. तुला मराठी बोलताना देखील मी पाहिले आहे. मला तुझा हेवा वाटतो कारण मी सुद्धा ही भाषा शिकण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे, पण अजून मला ती हवी तशी जमलेली नाही.''कार्यक्रमात पुढे आमीर खानने त्याच्यासोबत एका गावात येण्यासाठी अमिताभ बच्चन यांना आमंत्रण दिले. तो म्हणाला, ''गावकरी तुम्हाला भेटून फारच खुश होतील! आणि तुमच्यासाठी देखील तो एक वेगळा अनुभव असेल.'' बिग बींनी आनंदाने ते आमंत्रण स्वीकारले.