Join us  

'सहकलाकारांनी छक्का म्हणून हिणवलं'; आरती सोळंकीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:51 PM

Aarti solanki: मराठी कलाविश्वात आरतीला आला विचित्र अनुभव

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री आरती सोळंकी सातत्याने चर्चेत येत आहे. आरतीने तिचं तब्बल ५० किलो वजन घटवलं आहे. त्यामुळे तिच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहे. अलिकडेच आरतीने एका चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने वाढलेल्या वजनामुळे लोकांनी आपल्याला कशा प्रकारे वागणूक दिली, कसं ट्रोल केलं याविषयी भाष्य केलं आहे.

आरतीने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला. मराठी इंडस्ट्रीमधील काही महिला को आर्टिस्टने तिला चक्का छक्का या नावाने हिणवलं, असा खुलासा तिने यावेळी केला. तिचं हे वक्तव्य सध्या चर्चेत  आलं आहे.

लोकांचे टोमणे ऐकले, हातच्या भूमिका गेल्या; आरती सोळंकीने घटवलं 50 किलो वजन

"वजन कमी करण्यासाठी माझ्या एका मित्राने मला काही एक्ससाईज शिकवल्या त्यातल्या काही मी केल्या आणि माझं वजन ११९ पर्यंत आलं. पण मग मला पायाचा त्रास व्हायला लागला ज्यामुळे मी ते बंद केलं. या काळात मी डाएटवर होते. म्हणजे कंट्रोलमध्ये खाणं होतं. या काळात एक घटना घडली.  मी एका शूटला गेले रिअॅलिटी शो होता तो. त्या शोमध्ये ज्या महिला को-आर्टिस्ट असतात ना त्यांनी मला हिणवलं. म्हणजे फार विचित्रपणे हिणवलं. मला बोलतानाही त्रास म्हणता येणार नाही. पण, ही इतकी वाईट वृत्ती आहे. माझ्या सोबत ज्या लेडीज आर्टिस्ट होत्या त्यांनी मला छक्का म्हणून हिणवलंय", असा खुलासा आरतीने केला.

पुढे ती म्हणते, "ते एक स्लोगन होतं. त्यात मी एका बाजूला आणि बाकीच्या एका बाजूला. तर छक्का म्हटलं की त्या सगळ्या जणी माझ्याकडे हात करायच्या. मी सुद्धा सुरुवातीला त्या फ्लोमध्ये आले की अरे व्वा स्लोगन छान आहे वगैरे. पण मग समोरच्यांच्या रिअॅक्शन आणि यांच्या रिअॅक्शन हे पाहून दिवसभर मला असं जाणवून दिलं गेलं की आम्ही तुला छक्का म्हणतोय. त्या दिवशी मला खूप त्रास झाला. त्या दिवशी मी कसंबसं शूट केलं. आधी मी हेल्थसाठी वजन कमी करत होते. पण, त्यानंतर मला जे हिनवलं गेलं, जो द्वेष केला गेला त्यासाठी ठरवलं. मला छक्का म्हणाले याचा राग नाही. कारण, ती शिवी नाही. ते एक जेंडर आहे. तो एक समाज आहे. मुळात ते स्वाभिमानी माणसं आहेत. त्यामुळे मला त्या लोकांचा खरंच मनापासून आदर आहे. म्हणून मला तो शब्द वापरला याचं दु:खं नाही. मात्र, या हिनवणाऱ्यांची जी वृत्ती आहे ना त्याचं मला प्रचंड वाईट वाटलं."

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठीसिनेमा