Join us

आर्या आंबेकर सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वासाठी आहे उत्सुक कारणही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:10 PM

सारेगमप या कार्यक्रमाने आम्हा ५ जणांना आमचं गाणं सादर करण्यासाठी इतका मोठा मंच दिला आणि या क्षेत्रात सुध्दा उत्तम करिअर होऊ शकतं ही आशा आणि दिशा ही दिली.

आपल्या गोड आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रात देखील तिचं नशीब आजमावलं आणि त्यामुळे आज तिचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात आता आर्या ज्युरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

 

नवीन भूमिकेबद्द आर्या आंबेकर सांगते.सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वासाठी मी खूपच उत्सुक आहे कारण एकतर ही स्पर्धा लहान मुलांसाठी असते, त्यांचा निरागसपणा, त्यांचं गाणं आणि एकंदरीतच त्यांच्यात असलेलं टॅलेंट या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच बघायला नेहमीच आवडल्या आहेत. त्यात आता १२ वर्षानंतर हे पर्व भेटीला येणार आहे म्हणजे एका जनरेशनचा फरक असणार आहे.

सारेगमप या कार्यक्रमाने आम्हा ५ जणांना आमचं गाणं सादर करण्यासाठी इतका मोठा मंच दिला आणि या क्षेत्रात सुध्दा उत्तम करिअर होऊ शकतं ही आशा आणि दिशा ही दिली. आमचं गाणं या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आणि आम्हाला लोकप्रियता मिळाली ती देखील सारेगमप लिटिल चॅम्प्समुळेच. झी मराठी वाहिनी ही आमच्या कुटुंबासारखीच आहे, आणि विशेषतः लिटिल चॅम्प्सचा मंच तर आमच्या हक्काचा, आमच्या खूप जवळचा विषय आहे! त्यामुळे याचा पुन्हा एकदा एक भाग होता येतंय याचा अर्थातच खूप आनंद आहे.

त्यावेळी आम्ही स्पर्धक होतो, प्रत्येक एपिसोड हा आमचा अभ्यासाचा विषय असायचा. गाण्यात चूक होऊ नये म्हणून आम्ही अतोनात प्रयत्न करायचो. यावेळी मात्र ज्युरी म्हणण्यापेक्षा ताई दादाच्या भूमिकेत असणार आहोत. ही वेगळी भूमिका  निभावताना खूप मोठी जबाबदारी असणार आहे मात्र झीची टीम पाठीशी आहे त्यामुळे निभावून नेऊ असा विश्वास वाटतो. 

ज्यूरीच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत हे कळल्यावर थोडंसं जास्त जबाबदारीनं गाणी ऐकणं,खुपशी गाणी आता आधी स्वतः बसवणं, स्पर्धक काही चुकले तर त्यांना सुधारता येईल एवढ्या बारकाईने गाणी बसवणं अशी बरीच तयारी सुरू केली आहे. मला अजून एक सांगावस वाटतं की तेव्हा आम्ही सगळे स्पर्धक होतो. लोकांनी आमच्यावर आणि आमच्या गाण्यावर खूप प्रेम केलं आणि खूप आशीर्वाद ही दिले. आता नव्या भूमिकेत सगळ्यांचा भेटीला येणार आहोत. तर या ही वेळी तेवढंच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असतील अशी आशा आणि खात्री आहे. 

आम्ही जरी परीक्षक/ज्युरीच्या खुर्चीत बसलो असलो तरी वयाने आणि विद्येने लहान आहोत याची आम्हाला जाणीव आहे. लिटिल चॅम्प्सच्या ताई दादाच्या भूमिकेत असणार  आहोत. हा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे चूक झाली तर प्रेक्षकांनी ती पोटात घेऊन या कार्यक्रमावर आणि आमच्यावर पुर्वीसारखंच प्रेम करावे हेच मी आवाहन करेन.