MC Stan Abdu Rozik Fight: ‘बिग बॉस १६’मध्ये शिव मंडलीची प्रचंड चर्चा झाली. या मंडलीतील एमसी स्टॅन (MC Stan) हाच सीझनचा विजेताही झाला. साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुम्बुल, निम्रत कौर व अब्दू रोझिक असे सगळे या मंडलीचा भाग होते. पण शो संपला तसा आता या मंडलीत फूट पडल्याची चर्चा आहे. होय, अब्दू रोझिकने (Abdu Rozik) याला दुजोरा दिला आहे. अब्दू व एमसी स्टॅन यांच्यात काही तरी बिनसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.
अब्दू रोझिकने एमसी स्टॅनवर अनेक गंभीर आरोप केले होते. तो म्हणाला की एमसी स्टेन त्याचा कॉल उचलत नाही. अब्दू रोझिकच्या टीमने निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्याने स्टेनवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. स्टॅनच्या मॅनेजरवर शिवीगाळ व कारचं नुकसान केल्याचा आरोप अब्दूच्या टीमकडून करण्यात आला आहे. “सर्वात आधी रमजानच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. रमजानच्या महिन्यात एमसी स्टॅन व अब्दू रोझिकमधील वादाचं खरं कारण समोर येणं गरजेचं होतं”, असं निवेदनात म्हटलं आहे.
“११ मार्चला अब्दू व स्टॅन दोघेही बंगळूरमध्ये होते. त्यावेळी अब्दूने एमसी स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगतिलं. त्यानंतर अब्दूने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दूला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं”, असंही निवेदनात म्हटलं आहे.
काही म्युझिक कंपन्यांना अब्दु व स्टॅनला एकत्र काम करण्यासाठी ऑफरही दिल्या होत्या. परंतु, स्टॅनने त्या नाकारल्या, असंही निवेदनात म्हटलं गेलं आहे. “अब्दूने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. पण, अब्दुने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्टॅनच्या आईला कॉल केला होता. तो व्यवस्थित खेळत आहे, असं त्याने स्टॅनच्या आईला सांगितलं होतं”, असं अब्दुच्या टीमने सांगितलं आहे.