साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे. शिर्डीच्या साई बाबांच्या भक्तांना त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारांबद्दल माहिती आहे आणि त्यांनी दिलेल्या प्रेम आणि समानतेचा संदेश ते जाणतात. टीव्ही मालिकेतील कलाकार हे सदा सर्वकाळ सेटवर आपल्या शुटींगमध्येच व्यस्त असतात. मात्र मालिकेच्या सेटवर मिळणारा मोकळा वेळ काही कलाकार आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी खास करून बाजूला काढत असतात. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘मेरे साई’ या मालिकेतील साईबाबांची भूमिका करणारा कलावंत अबीर सूफीने देखील शुटींगमधल्या या निवांत क्षणांसाठी निवडलाय असाच एक मित्र...जेव्हा कधी मोकळा वेळ मिळतो, तेव्हा अबीर सूफी तिथल्या ग्रामोफोनवर गाणी ऐकताना दिसतोय. व्यक्तिगत आयुष्यात देखील त्याला ग्रामोफोनवर गाणी ऐकणे आवडते. जेव्हा त्याला कळले ‘मेरे साई’ मालिकेत शुटींगसाठी ग्रामोफोन येणार आहे तेव्हाच त्याने मनाशी ठरवले होते की, जेव्हा कधी मोकळा वेळ मिळेल... तेव्हा या ग्रामोफोनला आपल्या फावल्या वेळेतला साथी बनवायचे. सेटवर जेव्हा ही कलाकारांना मोकळा वेळ मिळतो, तेव्हा ते सर्वच कलाकार या ग्रामोफोनवर गाणी ऐकत असतात. यावर अबीर सूफी सांगतो, मला ग्रामोफोनवर गाणी ऐकणे आधीपासूनच आवडत होते. जेव्हा मालिकेतील शुटींगसाठी ग्रामोफोन येणार आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा त्यावर वाजवण्यासाठी मी काही उत्तम गाण्यांच्या व्हिनल डिस्क आवर्जून मागवून घेतल्या. ‘मेरे साई’ मालिकेच्या सेटवर जेव्हा चित्रीकरणामध्ये ब्रेक मिळतो, तेव्हा एखाद्या निवांत जागी बसून मी याच ग्रामोफोनवर गाणी ऐकत असतो. त्यावर गाणं ऐकून मनाला विलक्षण शांती लाभते. ग्रामोफोनवरच्या गाण्यांचा सुमधुर आवाज मनमोहक वाटतो. हल्ली सेटवरचे लोक देखील म्हणू लागले आहेत की, अबीरला त्याचा नवा मित्र मिळालाय. अबीर त्याच्या या नव्या मित्रासोबत खूपच खूश आहे.
अबीर सूफीला मेरे साईच्या सेटवर मिळाला हा नवा मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:13 AM