मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. अबीर सुफीची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. अबीर एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच त्याच्यात आणखी एक कला आहे. त्याच्या या कलेविषयी नुकतेच मेरे साई या मालिकेच्या सेटवर सगळ्यांना कळले.
अबीर सूफी या गुणी कलाकाराला मेरे साई या मालिकेमुळे आपल्यातील एक छुपी कला सादर करण्याची संधी मिळाली. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक आहे. मेरे साईच्या चित्रीकरणास लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि हा आनंद द्विगुणित होण्याचे आणखी एक कारण म्हणजे साईंच्या समाधी घेण्याच्या घटनेस देखील 100 वर्षं पूर्ण होत आहेत. मालिकेतील सध्याच्या कथानकात द्वारकामाईत साईंना नेहमी भेटायला येणारी मुले काही कारणामुळे दुःखी आहेत. मुलांवर खूप प्रेम करणारे साई बाबा गाणे गाऊन मुलांचे मन खूश करण्याचे ठरवतात. त्यामुळे याच भागात अबीरने हरे राम हरे कृष्ण हे भजन गाऊन आपले गायन कौशल्य दाखवले. सेटवर उपस्थित दिग्दर्शकापासून ते समस्त क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनाच अबीरचा मधुर आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी अबीरला पुन्हा गाणे म्हणण्याचा आग्रह केला. याविषयी अबीरला विचारले असता तो सांगतो, “हे खरे आहे. सध्याच्या कथानकाचे चित्रीकरण करत असताना मी काही ओळी गायलो. मी काही व्यावसायिक गायक नाही पण मला भजने गायला आवडतात आणि लहानपणापासून माझ्या भावासोबत मी भजन गात आलो आहे. आम्ही लहान असताना आईबरोबर मंदिरात जायचो आणि तिने आम्हाला संस्कृत आणि श्लोक देखील शिकवले होते. मी सेटवर भजन गायलो, तेव्हा मी पुन्हा लहान झालो आहे, असे मला वाटले. तो एक सुंदर क्षण होता आणि तो माझ्या कायम स्मरणात राहील.”
मेरे साई या मालिकेतील हे भजन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अबीरला खात्री आहे.