बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले सहभागी झाले होते. त्यांच्या बेधडक विधानांमुळे ते खूप चर्चेत आले होते. मुळचे साताऱ्याचे असलेले अभिजित बिचुकले यांनी नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीच्या पदासाठी प्रयत्न केले होते. मात्र आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश आले नाही.
खासदार उदयनराजे भोसले यांना खुलेआम आव्हान देणारे बिचुकले याच कारणामुळे चर्चेत राहिले. ‘२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरणार’, ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’, ‘कवी मनाचा नेता’ अशी अनेक वक्त्यव्य त्यांनी केलेली पाहायला मिळतात. त्याचमुळे त्यांना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश मिळाला होता.
बिग बॉसच्या घरात राहून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी बिचुकले प्रकरण खूप गाजले होे. बिग बॉसच्या घरात त्यांची अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत चांगली मैत्री जुळली होती.
अभिजित बिचुकले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांनी पुण्यात स्वतःचा सातारा कंदी पेढ्यांचा विक्री व्यवसाय सुरू केला आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा स्पर्धक पराग कान्हेरेने नुकतीच ही बातमी सांगितली आहे. साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार आहे.
पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्यांनी हे कंदी पेढ्यांचे दुकान थाटले आहे. पराग कान्हेरेने बिचुकले यांना त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिचुकले’ यावेळी नाही चुकले ….असे म्हणून बिचुकले यांचे त्याने स्वागत आणि अभिनंदन केले आहे.