'रंग माझा वेगळा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक. हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, अनघा भगरे अशी या मालिकेची स्टारकास्ट होती. या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. अभिनेत्री रेश्मा शिंदे ही या मालिकेची मुख्य नायिका होती. रेश्माने सावळ्या मुलीची दीपा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यासाठी रेश्माला थोडा सावळा मेकअप करण्यात आला होता. पण, यामुळे मात्र प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल केलं होतं. गोऱ्या अभिनेत्रीला सावळा मेकअप करण्यापेक्षा सावळ्या रंगाची अभिनेत्री का घेतली नाही? असा प्रश्न विचारला जात होता. याचं उत्तर आता मालिकेच्या लेखकाने दिलं आहे.
२०१९ साली सुरू झालेल्या 'रंग माझा वेगळा' या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अभिनेता आणि लेखक अभिजीत गुरूने या मालिकेचं लेखन केलं होतं. अभिजीतने नुकतीच 'सेलिब्रिटी कट्टा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने 'रंग माझा वेगळा' मालिकेत दिपाच्या भूमिकेसाठी सावळ्या रंगाच्या मुलीला का घेतलं नाही ? या प्रश्नाचं उत्तर दिलं. याशिवाय रेश्माला सावळा मेकअप का करावा लागला, याचा खुलासाही अभिजीतने या मुलाखतीत केला.
अभिजीत म्हणाला, "मी पहिल्या दिवसापासून या मालिकेशी निगडीत होतो. आम्ही सावळ्या मुलीला कास्ट करण्याचे प्रयत्न केले होते. त्यासाठी जवळ जवळ १०० मुलींच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्या १०० ऑडिशनमधून ४-५ मुलींना सिलेक्टही करण्यात आलं होतं. मी काही ऑडिशनही पाहिल्या होत्या. काहींना जमत नव्हतं, काही चांगल्या अभिनेत्री होत्या. पण, या भूमिकेसाठी त्या योग्य दिसत नव्हत्या. यातून टीमने सावळ्या रंगाच्या ४-५ मुली निवडल्या होत्या. पण, त्या पाचही मुलींनी काही ना काही कारण सांगून या भूमिकेसाठी नकार दिला. मग चॅनेल काय करणार?".
'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा ही भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने साकारली. ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने २०२३ मध्ये निरोप घेतला. आता रेश्मा शिंदे स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.