अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशाच एका गोड व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी अभिनेता आणि त्याच्या लेकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बापलेकीचं गोड नातं पाहून डोळे भरुन येत आहेत.
मराठी अभिनेताअभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेकीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत त्याच्या लेकीचे केस बांधताना दिसत आहे. बायको ऑफिसला गेल्याने अभिजीत लेकीची वेणीफेणी करताना दिसत आहे. "आई ऑफिसला जाते तेव्हा आम्ही...", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
अभिजीत हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही तो सहभागी झाला होता. सध्या तो 'आजीबाई जोरात' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्येही तो दिसला होता.