अनेक सेलिब्रिटी समाजातील घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. समाजातील गंभीर मुद्द्यांवर अगदी निर्भिडपणे सेलिब्रिटी त्यांचं मत मांडतात. मराठी अभिनेताअभिजीत केळकरदेखील समाजातील विविध मुद्द्यांवर अगदी परखडपणे भाष्य करताना दिसतो. नुकतंच त्याने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने एक प्रसंगदेखील सांगितला आहे.
करवा चौथच्या निमित्ताने अभिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत राजकीय पक्षांना खोचक टोला लगावला. "आज सर्व पक्षांतील साहेबांच्या कृपेकरून...घोडबंदर रोडवरील, घाटातील चांद्रभूमीवर, सर्व पक्षांतर्फे सामुहिक, करवा चौथचे आयोजन करण्यात आलं आहे...तरी नागरिकांनी ह्या मोफत सेवेचा अवश्य लाभ घ्यावा- निमंत्रक आणि शुभेच्छुक (सर्वच पक्षातील साहेब)", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे अभिजीतने कॅप्शनमध्ये त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. "ठाण्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि बारा महिने, २४ तास रहदारीचा असलेला घोडबंदर रोड...गेली अनेक वर्ष, त्यावरील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामामुळे चर्चेत असतो. दोन्ही बाजूच्या गाड्या, heavy ट्रक्स, ट्रॉलर्स रोज येऊन घाटात अडतातच. त्यात इथे स्ट्रीट लाइट्सही नाहीत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे वाहनं अडतात ते वेगळंच...रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो. मीही काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी, बाईक accident मधे, मरता मरता वाचलो होतो. पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही. निवडणुका आल्या-गेल्या, येतील-जातील, तसेच जीवही गेले, जातील आणि अंतरालातला हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिजीत केळकरच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अभिजीतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.