‘माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील गुरुनाथ उर्फ गॅरीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेत आपल्याला अभिजीत खांडकेकरला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला होता. अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे. आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची' सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या मालिकेतून गुन्हेगारी विश्व आणि त्यापासून कसं सावध राहता येईल याविषयी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून त्याने काही काळ रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे. त्याच्याकडे असलेले संवाद फेकीचे कौशल्य आणि त्याची भाषेवरची पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो.