Join us

'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत अभिजीत केळकर साकारणार बालगंधर्व !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 3:31 PM

Yogyogeshwar Jai Shankar : बालगंधर्व यांचा शंकर महाराजांशी असलेला ऋणानुबंध, त्यांनी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी अनुभवली? कसे महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली यांचा उत्कट प्रवास मालिकेत बघायला मिळणार आहे.

 कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar ) मालिकेत आता सुरू होणार गोष्टी खास आहे, कारण शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे. बालगंधर्वांची ही भूमिका लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर साकारणार आहे. बालगंधर्व यांचा शंकर महाराजांशी असलेला ऋणानुबंध, त्यांनी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी अनुभवली? कसे  महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली यांचा उत्कट प्रवास मालिकेत बघायला मिळणार आहे. 

बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल.मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला,अश्या अद्वितीय बालगंधर्वांसोबत  शंकर महाराजांची भेट कशी घडली ?  तो अविस्मरणीय प्रसंग काय होता ? हे प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. 

याबद्दल अभिजीत केळकर म्हणाला, जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली, तेव्हा पासून खूप उत्सुकता होती. आणि मला ही भूमिका करायचीच होती त्यामुळे मी होकार दिला. खरंतर माझा पहिले विश्वासच बसत नव्हता, मला कधी स्वप्नात देखील नाही वाटलं मला याबद्दल विचारणा होईल. कारण बालगंधर्व हा चित्रपट देखील करताना शंकर महाराज आणि त्यांचं काही नातं होतं किंवा आध्यात्मिक नातं त्यांच्यात होते असं मला तेव्हा देखील माहिती नव्हतं. चित्रपट करत असताना कधीतरी, केव्हातरी ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल असे वाटत होते. कारण जे वैभव, सर्वार्थाने जे वैभव बालगंधर्व यांनी अनुभवलं, निर्माण केलं, ज्याचा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना देखील दिला असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व साकारायला मिळणं हे स्वप्नवत आहे असं मला वाटत आणि ते या मालिकेच्या द्वारे घडलं. "A Dream come True" मला सेटवर आल्यावर ते अनुभवता येतं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आणि उत्सुकता आहे.