टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची पर्सनल लाईफ पूर्वापार चर्चेत राहिली आहे. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगाही झाला. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर या नव्या नात्यातही कुरबुरी सुरु झाल्या. काही महिन्यांपूर्वी अभिनवने श्वेतावर अनेक आरोप केले होते. श्वेता आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करतेय, असा आरोप त्याने केला होता. आता अभिनवने श्वेताला मानहानी नोटीस पाठवले आहे.
अलीकडे श्वेता कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. अशास्थितीत तिने मुलगा रेयांशला अभिनवकडे सोडले होते. मात्र यादरम्यान अभिनवने एक नवा आरोप केला होता. 25 आॅक्टोबरला श्वेता रेयांशला घेऊन गेली आणि यानंतर आपला मुलगा गायब आहे. श्वेताने त्याला अज्ञातस्थळी लपवल्याचे अभिनवने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर एका ताज्या मुलाखतीत अभिनवने पुन्हा एकदा श्वेतावर गंभीर आरोप केले आहेत.
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनवने आपबीती सांगितली. त्याने सांगितले, ‘मी आज एक आठवड्यानंतर माझा मुलगा रेयांशला भेटलो. मात्र काही वेळात श्वेताने त्याला पुन्हा माझ्यापासून दूर केले. लग्नापासून आत्तापर्यंत मी एक चांगला पती व एक चांगला वडील बनण्याचा प्रयत्न करतो. मात्र लाख प्रयत्न करूनही आज मी एकटा आहे. आपल्या मुलापासून दूर आहे. श्वेता तिवारी सेलिब्रिटी आहे. त्यामुळे जगाच्या नजरेत प्र्रत्येकवेळी मीच वाईट ठरतो. श्वेताने माझ्यावर चुकीचे आरोप लावले. मला तुरुंगात पाठवले. मात्र मी माझे दु:ख कोणालाही सांगितले नाही. आता ती माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेते आहे आणि म्हणून एका बापाचे दु:ख जगापुढे येतेय. मी श्वेताला मानहानी नोटीस पाठवले आहे. 14 दिवसांत तिने उत्तर दिले नाही तर मी कायदेशीर कारवाई करेन.’
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्वेता घटस्फोटावर बोलली होती. घटस्फोटानंतर एका बाईला कुठल्या मानसिक आंदोलनातून जावे लागते, याची कल्पना तुम्ही करू शकता. मी सुद्धा या सगळ्यांतून गेले. पण सतत या घटस्फोटाबद्दल विचार करत बसायला, रडत बसायला माझ्याजवळ वेळ नाही. कारण माझ्या घरात मी एकटी कमावणारी आहे. त्यामुळे मी डिप्रेस होऊ शकत नाही. निश्चितपणे माझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. मात्र मला यातून बाहेर यावेच लागणार आहे. माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत. अनेक लोकांची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी स्ट्रेस किंवा दु:खात राहू शकत नाही. माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे, असे ती म्हणाली होती.