Join us

राजीव निगमचे परखड मत,म्हणाला काही लोक हे जन्मजात राजकारणीच असतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 11:31 AM

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या राजकीय विडंबनात्मक मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट मुख्यमंत्र्याची भूमिका रंगविणारे अभिनेते ...

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या राजकीय विडंबनात्मक मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट मुख्यमंत्र्याची भूमिका रंगविणारे अभिनेते राजीव निगम हे विनोदाचे त्यांचे अचूक टायमिंग आणि राजकीय विडंबन सादर करण्याचे त्यांचे कौशल्य यामुळे सध्या प्रेक्षकांचे अतिशय आवडते कलाकार बनले आहेत.अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी आपण ही भूमिका इतक्या सहजतेने कशी साकार करतो, त्याबद्दल मत प्रदर्शित केले.त्यांनी सांगितले,“मी मूळचा कानपूरचा रहिवासी असून आम्हाला लहानपणापासून त्याच वातावरणात वाढविले जात असल्याने मला एका राजकीय नेत्याची भूमिका रंगविण्यात कोणतीच अडचण आली नाही.उत्तर प्रदेशातील लोक हे जन्मजातच राजकारणी असतात. इथला प्रत्येकजण बिनधास्त असतो आणि प्रत्येकजण स्वत:ला राजकीय नेताच समजतो.इथले लोक राजकारण कोळून प्यायले असल्यानेच या राज्याने आजवर इतके उत्तम राजकीय नेते देशाला दिले आहेत.”राजकारणाची सूक्ष्म जाण असलेल्या निगम यांनी सांगितले की आपल्या मालिकेने कोणत्याही एका पक्षाला किंवा नेत्याला आपले लक्ष्य केलेले नाही, उलट राजकीय विडंबनाची तीव्रता आपण जरा कमी केली आहे.देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत उपहासात्मक भाष्य केले जाते. केवळ आपले खिसे भरण्यासाठी सत्ता प्राप्त करण्यास हपापलेल्या चैतूलाल या भ्रष्ट नेत्याच्या राजकीय कारस्थानांभोवती या मालिकेचे कथानक गुंफले आहे.प्रत्येक भागात नवे राजकीय विडंबन, भ्रष्ट नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी आणि पुरेपूर करमणुकीमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.नेहमीच्या सासू-सुनेच्या रटाळ कथांनी भरलेल्या मालिकांच्या विश्वात या मालिकेने आपल्या नावीन्यपूर्ण विषयामुळे ताज्या हवेची झुळूक आणली आहे.लोकांच्या सेवेपेक्षा आपले खिसे भरणे हेच ज्याचे सत्तासंपादण्यामागील ध्येय आहे, अशा चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याची भूमिका या मालिकेत राजीव निगम साकारीत आहेत. गेली अनेक वर्षे विनोदी लेखन आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियनचे काम केलेल्या राजीव निगम यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले आहे. ते सांगतात,“मी विनोदवीर बनण्यासाठीच मुंबईत आलो आणि माझ्या सुदैवाने मला तशी संधी मिळालीही. आज लोक मला विनोदी लेखक आणि कॉमेडियन म्हणून ओळखतात.माझ्या निश्चित अशा भावी योजना नाहीत, पण जोवर जिवंत आहे,तोपर्यंत मी लोकांना हसवीत राहीन, एवढे निश्चित.”या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे राजीव निगम यांचे ध्येय असून आजवर प्रेक्षकांनी आपल्याला जसा पाठिंबा आणि प्रेम दिले तसेच ते यापुढेही देत राहतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.