काही दिवसांपूर्वीच सोनी मराठीवर 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मराठी आणि कानडी भाषिक जोडप्याची प्रेमकहानी या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करत आहे. विशेष म्हणजे या जोडीसोबत दिग्गज कलाकारही असून आता या कलाकारांच्या यादीत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची एन्ट्री झाली आहे.
नुकतंच या मालिकेत १५ ऑगस्ट मोठ्या थाटात पार पडलं. या दिवसाचं निमित्त साधत मालिकेत अच्युत पोतदार यांची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत अच्युत पोतदार हे गावचे ज्येष्ठ पुढारी आणि जगविख्यात शास्त्रज्ञ भास्कर आनंद ही भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची एन्ट्री आप्पा आणि तात्या यांचं भांडण सोडवण्यापासूनच होते.
१५ ऑगस्ट असल्यामुळे गावात झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, झेंडावंदनाचा मान कोणाला मिळणार यावरुन अप्पा आणि तात्या यांच्यात पुन्हा नवा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. यांचं भांडण सुरु असतानाच गावचे ज्येष्ठ पुढारी भास्कर आनंद हे या वादामध्ये पडतात आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भास्कर आनंद यांच्या येण्यामुळे आप्पा आणि तात्या यांच्यातील वाद मिटतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, या मालिकेत विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.