गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आणि त्यांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणारी मालिका म्हणजे 'सीआयडी'(CID). सस्पेन्स-क्राईम असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० वर्ष मालिका चालली. २०१८ साली शोने सर्वांचा निरोप घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच मालिका सीझन २ सह पुन्हा सुरु झाली. आता यामध्ये एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांचाच मृत्यू दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नुकताच हा एपिसोड शूट करण्यात आला आहे.
अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना कायम एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं. त्यांना या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेत सीआयडीचे तेच प्रमुख दाखवण्यात आले आहेत. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचं हे पात्र मरणार आहे. बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू होतो असा तो सीन असणार आहे. येत्या एपिसोडमध्ये बारबुसा(तिग्मांशू धुलिया) सीआयडी टीमला संपवण्यासाठी बॉम्ब लावतो. या घटनेत इतर सदस्य सुरक्षित राहतात पण एसीपी प्रद्युम्न यांचा दुर्देवी मृत्यू होतो. तिग्मांशू धुलिया मालिकेत कुख्यात गँगस्टर बारबोसाची भूमिका साकारत आहे.
दरम्यान कलाकारांनी नुकतंच या एपिसोडचं शूटही केलं आहे. काही दिवसात हा एपिसोड प्रसारित होणार आहे. यापेक्षा अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही कारण हा चाहत्यांना मोठा धक्का मिळेल अशी मेकर्सची योजना आहे.