अ‍ॅक्टिंग हेच माझं पॅशन!- अशनूर कौर

By अबोली कुलकर्णी | Published: December 1, 2018 07:04 PM2018-12-01T19:04:13+5:302018-12-01T19:05:20+5:30

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

 Acting is my passion! - Ashish Kaur | अ‍ॅक्टिंग हेच माझं पॅशन!- अशनूर कौर

अ‍ॅक्टिंग हेच माझं पॅशन!- अशनूर कौर

googlenewsNext

अबोली कुलकर्णी

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील ‘पतियाला बेब्स’ या मालिकेत मिनीच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी केलेला हा संवाद...

* ‘पतियाला बेब्स’ मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?

- ही मिनी आणि तिची आई बबिता (बेब्स) ह्यांच्या नात्यांची एक लक्षवेधक आणि लोभस गोष्ट आहे. मी पतियाळामधील एका मुलीची म्हणजे मिनीची भूमिका करतीये. ती एक फॅशनेबल, विनोदी, हट्टी, ध्येयवादी आणि हवं ते मिळवणारी मुलगी आहे. इतर कोणत्याही आई आणि मुलीसारख्या, जरी त्या दोघी लहानसहान गोष्टींवरून भांडत असल्या तरी मिनी ही बेब्सबद्दल खूपच बचावात्मक आणि कधीकधी अधिकाराने वागते. त्या दोघी साध्यासुध्या विनोदांवर सुद्धा जोरजोरात हसतात आणि रोमँटिक हिंदी सिनेमांमधील भावविवश प्रसंग बघून रडतातसुद्धा. एकीने काही खाल्लं नसेल तर दुसरी खात नाही आणि दिवसभरातल्या घडामोडी एकमेकींना सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्या भावनांनी एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत आणि हाच ह्या मालिकेचा गाभा आहे. मिनी नेहमीच आईबरोबर असते आणि मिनीचं तेच प्राधान्य आहे.

* तू मुळची पंजाबी असल्याने किती सोप्पं होतं तुझ्यासाठी या भूमिकेसोबत जुळणं?

- आम्ही नेहमीच पंजाबमध्ये राहिलो आहोत आणि माझे आईवडील व नातलग पंजाबीत बोलतात. त्यामुळे ते उच्चार माझ्यासाठी सवयीचे आहेत. मला स्वत:ला ‘मेथड अ‍ॅक्टर’ म्हणायला आवडेल. सेटवर असताना मला स्वत:बरोबर वेळ घालवायला आवडतं जेणेकरून मी ही भूमिका अजून चांगली करू शकेन. मला वाटतं की, प्रत्येक कलाकाराला आपण करत असलेली भूमिका संपूर्णपणे समजून केली पाहिजे नाहीतर त्याचा परिणाम इतर कलाकारांच्या कामगिरीवर होऊ शकतो. हे पात्र बरंचसं माझ्यासारखं आहे. मिनीचं तिच्या आईबरोबर जसं नातं आहे तसंच नातं माझ्या खऱ्या  आईबरोबर आहे. ह्या भूमिकेतून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

* तुझी आणि पारधीची बाँण्डिंग कशी आहे?

- परिधीबरोबर काम करणं म्हणजे एक स्वप्नच आहे. आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यावरच आमचे स्वभाव जुळले. ती खूपच गोड आणि समजूतदार आहे आणि आम्हाला आमच्या अभिनयाच्या तांत्रिक गोष्टी माहित असल्याने आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेतो. मला तिच्याबरोबर काम करताना खूप आनंद होतो आणि आम्ही एकत्र आमच्या संवादांमध्ये सुधारणा करण्याचा आणि आवश्यक असेल तिथे काही जास्तीचं करण्याचा प्रयत्न करतो.

* तुला तुझ्या भूमिकेविषयी काय तयारी करावी लागली?

- कोणत्याही मुलीसाठी तिची आई ही तिची सगळ्यात चांगली मैत्रीण असते. मिनी तिच्या आईबरोबर जसं वागते आणि तिची काळजी घेते ते माझ्या मनाला भिडतं. मिनी आणि बेब्समधील ह्या बंधनामुळेच मी हा कार्यक्रम स्वीकारला. आणि खरं कारण म्हणजे माझं माझ्या आईबरोबरसुद्धा असंच नातं आहे. ती माझ्याबरोबर प्रत्येक सेटवर असते. माझ्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी तिने खूप गोष्टींचा त्याग केला आहे. मी जे काही करू शकते ते फक्त तिच्यामुळेच आहे. मिनीची भूमिका ही तिने माझ्यासाठी केलेल्या त्यागांसाठी आहे. आईला धन्यवाद देण्याची माझ्यासाठी ही एक संधी आहे.

* अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटात तू तापसी पन्नू हिच्या बहिणीच्या भूमिकेत तू दिसली आहेस. आता पुन्हा तू मोठया पडद्यावर केव्हा दिसणार?

- सध्या तरी मी माझ्या याच मालिकेतील व्यक्तिरेखेवर लक्ष देण्याचा विचार केला आहे. याशिवाय ज्या चांगल्या आॅफर्स येतील त्या स्विकारण्याचा मी निर्णय घेतला आहे. 

Web Title:  Acting is my passion! - Ashish Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.