स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढचं पाऊल (Pudhacha Paul) या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. या मालिकेत जुई गडकरीसोबत तब्बल नऊ वर्षांनी अभिनेता मराठी कलाविश्वात दमदार कमबॅक करणार आहे. यात तो अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारणार आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता अमित भानुशाली आहे. अमित यात अर्जुन सुभेदार या भूमिकेत दिसणार आहे. ठरलं तर मग मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना अमित म्हणाला, ‘ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत.
स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे. आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही.
सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल.