'बाजी‘ मालिकेतून अभिनेता अभिजित श्वेताचंद्रचे पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:09 AM2018-08-07T10:09:49+5:302018-08-07T10:10:36+5:30
'ग्रहण' ही मालिका छोट्या पडद्यावरुन लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.‘ग्रहण’ मालिकेचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच पूर्ण झाले असून या आठवड्याच्या ...
'ग्रहण' ही मालिका छोट्या पडद्यावरुन लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.‘ग्रहण’ मालिकेचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच पूर्ण झाले असून या आठवड्याच्या अखेरीस ही मालिका संपणार आहे.या मालिकेच्या जागी आता नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.शंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका दाखवली जाणार आहे.
पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे आणि या कथेत अभिनेता अभिजीत श्वेताचंद्र हा बाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही बाजी एका शिलेदाराच्या पराक्रमाची आहे आणि हा शिलेदार अभिजीत छोट्या पडद्यावर साकारतो आहे.
त्याच्या या पदार्पणाबद्दल बोलताना अभिजित म्हणाला, "याआधी मी साकारल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. पण ‘बाजी’ या मालिकेतून प्रमुख भूमिकेत पदार्पण करताना अर्थातच थोडं दडपण होतं. एक मालिका करणं मग त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद गृहीत धरता आम्ही आमचं १०० नाही तर २०० टक्के देत आहोत आणि कुठेतरी प्रेक्षक देखील आता त्याची दाखल घेत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती आम्हाला मिळत आहे.
माझी 'बाजी' ही व्यक्तिरेखा म्हणजे शिवछत्रपती यांचा मावळा असलेला एक सामान्य मुलगा आहे जो स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहे. ही व्यक्तिरेखा जितकी आव्हानात्मक आहे तितकीच त्यासाठी मी मेहनत देखील घेतली. अगदी व्यक्तीरेखेच्या लुकवर घेतलेल्या मेहनतीपासून ते या व्यक्तिरेखेसाठी अपेक्षित असलेले तलवारबाजी, घोडेस्वारी यांसारखे स्टंट्स योग्यरित्या साकारण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करत आहे."