Join us

'स्वाभिमान' फेम अक्षय कोठारी पहिल्यांदाच बोलला अभिनेत्री मानसी नाईकसोबतच्या घटस्फोटाबद्दल, म्हणाला- '२०१९ हे वर्ष...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:54 PM

Akshar Kothari:अभिनेता अक्षर कोठारीने एका मुलाखतीत २०१९ हे वर्षे त्याच्यासाठी खूप खडतर गेल्याचे सांगितले.

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अक्षर कोठारी(Akshar Kothari)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अक्षरला स्वाभिमान (Swabhiman) मालिकेतून हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले होते. आराधना, छोटी मालकीण, चाहूल २ अशा मालिकेत तो पाहायला मिळाला. नुकतेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत २०१९ हे वर्षे त्याच्यासाठी खूप खडतर गेल्याचे सांगितले. 

चाहूल २ मालिकेतील त्याने साकारलेली सर्जाची भूमिका देखील खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून अक्षरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने देखील एकत्र काम केले होते. अक्षरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मानसी नाईक हिने चाहूल मालिकेत सर्जेरावची पत्नी मंदाकिनी साकारली होती. रिअल लाईफ मधले हे कपल मालिकेद्वारे ऑन स्क्रीनही हिट ठरले होते. ललित २०५, स्वराज्यजननी जिजामाता, गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती या आणि अशा विविध मालिकेतून मानसी नाईक हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र सर्व काही सुरळीत असतानाच या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २७ मे २०२१ रोजी अभिनेत्री मानसी नाईकने कांदिवली स्थित धृवेश कापुरीया सोबत दुसरा संसार थाटला. घटस्फोट झाल्यानंतर अक्षर खचून गेला होता. कित्येक रात्र जागून काढल्या.

याबद्दल त्याने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला की, २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेले. पत्नीसोबत विभक्त होणे आणि भावाचे आजारपण यामुळे मी कित्येक रात्र जागून काढल्या. माझा धाकटा भाऊ अमोद कोठारी याला एरिथमिया म्हणजेच हृदयाच्या अनियमित ठोक्याचा आजार होता. माझ्या भावाला काही तरी होईल या भीतीने मी कित्येक रात्री जागून काढल्या.

तो पुढे म्हणाला की, एखाद्या कलाकारासाठी त्याच्या खाजगी आयुष्यात काय घडतंय याची पर्वा न करता जगावे लागते. त्यानंतर मी छोटी मालकीण या मालिकेत काम करत होतो. मात्र माझा भाऊ जेव्हा खूप कठीण परिस्थितीतून जात होता. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असणारे स्टाफ माझ्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त होते. त्यावेळी मला जाणीव झाली की एखाद्या अभिनेत्याचे आयुष्य खूप वेगळे असते. अभिनेता हा नेहमीच हसतमुख असला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असते. माझ्या आयुष्यातल्या या सर्व गोष्टींनी मला चांगला कलाकार घडविण्यास मदत केली. प्रत्येक कलाकार या दुःखातून गेलेला असतो म्हणूनच तो उत्तम अभिनेता बनतो. अभिनेता बनायचे हा निर्णय मी घेतला होता ती माझी आवड होती. मला या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूप सहकार्य केले या क्षेत्रात येण्यासाठी मी पाच वर्षे त्यांच्या परवानगीची वाट पाहत होतो. भावाला गमावणे हे माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होतं. आयुष्यातला हा संघर्ष मला व माझ्या कुटुंबासाठी प्रेरक आहे असे मानतो.