मुंबई - दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण मालिकेने त्या काळात टीव्ही मनोरंजन क्षेत्रात इतिहास रचला होता. या मालिकेत रावणाची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्या निधनाला काही दिवस उलटण्यापूर्वीच रामायणामधील अजून एका पात्राची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. रामायण मालिकेमध्ये भगवान श्रीरामांचे मित्र असलेल्या निषादराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाल्याची माहिती दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
चंद्रकांत पंड्या यांचा जन्म १ जानेवारी १९४६ रोजी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी गावात झाला होता. त्यांचे वडील व्यावसायिक होते. तसेच ते गुजरातमधून येऊन मुंबईत स्थायिक झाले होते. चंद्रकांत यांचे बालपण मुंबईतच गेले. तसेच त्यांनी आपले शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले होते. दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चंद्रकांत यांचे छायाचित्र पोस्ट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
चंद्रकांत पंड्या यांनी रामायणाशिवाय इतर अनेक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. चंद्रकांत पंड्या हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमजद खान यांचे मित्र होते. चंद्रकांत पंड्या यांनी सुमारे १०० हून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकांमधील विक्रम वेताल, संपूर्ण महाभारत, होते होते प्यार हो गया, तेजा, माहियार की चुंडी, सेठ जगदंशा, भातर तारा वहता पानी, सोनबाई की चुंडी आणि पाटली परमार या मालिकांचा समावेश आहे.