अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने फिरोज यांनी अखेरचा श्वास घेतला. या दु:खद बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया अहवालानुसार २३ मे ला उत्तर प्रदेशमधील बदाऊन येथे फिरोज खान यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांचं निधन झालं.
अमिताभ यांचे डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख
रिपोर्टनुसार फिरोज काही काळ बदायूंमध्ये होते. शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभागी होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय होते. फिरोज खानने 4 मे रोजी बदायूं क्लबमधील मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स दिला. अभिनयासोबतच ते अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठीही ओळखले जात होते. डुप्लिकेट अमिताभ बच्चन अशी ओळख त्यांनी मिळवली होती.
फिरोज खान यांची कारकीर्द
फिरोज खान यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'भाबीजी घर पर हैं!', 'जिजा जी छत पर हैं', 'साहेब बीबी और बॉस', 'हप्पू की उल्टान पलटन' आणि 'शक्तिमान' या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. याशिवाय त्यांनी गायक अदनान सामीचे सुपरहिट गाणे 'थोडी सी तू लिफ्ट करा दे'सह अनेक म्यूझिक गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.